गृहलक्ष्मीचा चेहरा
व्रतस्थ जसा कोणी
तसा प्राजक्त अंगणी
झरत्या श्रावणसरी
सेवितो तीर्थ मानुनी
बोचऱ्या त्या थंडीत
नाही शोधित उबारा
गोठलेल्या क्षणांतही
राही हासरा हासरा
रण-रणत्या उन्हात
नाही चोरीत तो अंग
छाया धरतांना त्याचा
खुलतो हिरवा रंग
कधी गोंजारता त्याला
पसरी पानांच्या कडा
देतो जबाब घावाला
घालून फुलांचा सडा
त्याला पाहता मनाचा
सदा निवतो गाभारा
डोळ्यापुढे साकारतो
गृहलक्ष्मीचा चेहरा
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.