दोन ओंडक्यांची ---- !

 
      "यथा काष्ठं च काष्ठं च " चे  गदिमानी गीतरामायणात  रूपांतर करताना
 दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
 असे म्हटले आहे. पण कधीकधी आपल्या आयुष्यात मात्र दुसरी एकादी लाट उठते आणि अगदी  वेगळ्या ठिकाणी पुन्हा त्याच दोन ओंडक्यांची भेट घडवते
        माझ्या चाकरीच्या पहिल्याच वर्षात मला एक मजेशीर अनुभव आला.  त्या काळात अभियांत्रिकी अभ्यासक्रमात सत्र पद्धत नव्हती त्यामुळे संपूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमावर वर्षाच्या शेवटी एकदम आठ विषयांची परीक्षा असे शिवाय ए.टी.के.टी. वगैरे पण नसे.पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना फक्त एकच आधार असे तो म्हणजे जयकर नियमाचा.बॅ. जयकर एके काळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्या नियमानुसार कोणत्याही एका विषयात किंवा एकूण गुणांकात कमी पडत असेल तर एक टक्का गुण बहाल करण्यात येत. तरीही एकूण गुणही ४०% असणे आवश्यक असे म्हणजे सर्व विषयात उत्तीर्ण होऊनही जर एकूण गुणांची टक्केवारी ३८% असली तरी तो मुलगा अनुत्तीर्ण म्हणून जाहीर होत असे.३९% असेल तर जयकर नियमाचा फायदा त्याला मिळून तो उत्तीर्ण होत असे. तीच गोष्ट एका विषयात ३० गुण मिळाले व त्याची एकूण गुणसंख्या जर ४०% किंवा अधिक असली तर जयकर नियमानुसार तो उत्तीर्ण होत असे. जयकर नियम एक विषय किंवा एकूण गुणसंख्या  यापैकी एकालाच लागू होत असे..अशा कडक नियमामुळे प्रथम वर्षाचा निकाल बहुधा ३०% च्यावर क्वचितच जात असे. याशिवाय प्रथम वर्षाच्या परीक्षेस तीनच वेळा बसण्याची संधी मिळत असे जर तीनदा अनुत्तीर्ण झाला तर त्याला अभियांत्रिकी सोडून दुसरी वाट धरावी लागे.
         माझ्या एका मित्राचे असेच झाले होते.माझ्याबरोबरच पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात  प्रथम वर्षाला त्याने प्रवेश घेतला.तसे आम्ही फर्ग्युसन कॉलेजलाही दोन वर्षे बरोबरच होतो. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेत  तो अनुत्तीर्ण झाला त्यानंतर दोन संधी मिळाल्या व त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यावर अभियांत्रिकी पदवीचा नाद सोडून तो कोठे गेला ते मात्र काही कळले नाही व अभ्यासाच्या व्यापात त्याची चौकशीही करता आली नाही.मी अभियांत्रिकी अंत्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर औरंगाबाद तंत्रनिकेतनात प्राध्यापक म्हणून प्रवेश केला व तेथेही एकदम अंत्य वर्षासच शिकवण्यास मला सांगण्यात आले व वर्गात प्रवेश केला तर माझा हा मित्रच समोरच्या बाकावर बसलेला. त्याने अभियांत्रिकीच्या  पदवीची शक्यता नष्ट झाल्यामुळे  नाद सोडून इकडे तंत्रनिकेतनात प्रवेश घेतला असावा.
       आपला अगदी जवळचा मित्र समोर पाहून मी अगदी आचंबित झालो. माझे त्या विषयाचे लेक्चर  संपल्यानंतर मी बाहेर पडलो व तो मला "सर एक शंका आहे " असे विचारू लागला.मला एकदम लाजल्यासारखे झाले मी त्याला प्राध्यापककक्षात घेऊन गेलो आणि हातास धरून जवळ ओढत  म्हणालो." हे सर,सर काय लावले आहेस ?मला विसरलास की काय तू ?" तो एकदम खजिल होऊन म्हणाला " तस नाही रे पण वर्गात असताना तू सरच आहेस ना ?  मग तसेच म्हणायला नको का ?" "ठीक आहे रे  पण वर्गाबाहेर पडल्यावर मात्र आपण मित्र आहोत हे विसरू नको"  असे मी म्हटल्यावर  त्यालाही बरे वाटले.
       अमेरिकेत गेल्यावर  तेथे असतानाच पुण्यातीलच एक गृहस्थ  काही कारणाने चांगले परिचित झाले.  पुण्यातच असल्याने पुढील वेळी आम्ही अमेरिकेस जाणार आहोत हे कळल्यावर आपल्या मुलाला देण्यासाठी काही वस्तु त्यांनी आमच्याबरोबर दिल्या.आम्ही अमेरिकेत गेल्यावर त्यांच्या मुलाला फोन केल्यावर तो लगेचच आमच्याकडे आला. त्याच्याबरोबर जवळ जवळ माझ्याच वयाचे गृहस्थ होते.मित्राच्या मुलाने त्यांची ओळख आपले सासरे म्हणून करून दिली,व तो आमच्या मुलाशी गप्पा मारू लागला. योगायोगाने त्याच वेळी तेथे माझ्या औरंगाबादच्या महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक व   आमचे कौटुंबिक मित्रही असणाया गृहस्थांचा मुलगा   एडिसनला काही कारणाने आला होता तो आम्हाला भेटायला आला व थोड्या गप्पा मारून बाहेर पडला.तो गेल्यावर माझ्याकडे आलेल्या गृहस्थांनी " हा औरंगाबादच्या पॉलिटेक्निकमधील अमुक अमुक सरांचाच मुलगा ना ?" असं विचारल्यावर आश्चर्य वाटले व मी "हे तुम्हाला कसे कळले ?" असे विचारल्यावर  " अगदी त्यांच्यासारखा दिसतो आहे" असे ते म्हणाले."पण त्याना तुम्ही कसे ओळखता ?" असे मी आणखीच आचंबित होऊन विचारले त्यावर त्यानी उत्तर दिले " अहो मी त्याच पोलिटेक्निकमध्ये शिकलो " हे ऐकून मी त्याना म्हणालो"अहो मी तेथेच प्राध्यापक होतो "आमच्या प्राध्यापक मित्राच्या कधीही न पाहिलेल्या मुलाला ओळखणाऱ्या या गृहस्थाला मी त्याच तंत्रनिकेतनात काम करत होतो याची मात्र माहिती नसावी याचे मला नवल वाटलं पण मग त्या गृहस्थांनी उठून नमस्कार करत ,"सर तुम्ही तर आम्हाला शिकवत होता,मी तुम्हाला ओळखले पण एकदम तसे सांगण्याचा धीर झाला नाही " त्याच्या नम्रपणाचे कौतुक करावे की इतकावेळ नुसते गप्प बसल्याबद्दल त्याला चांगलेच झाडावे काही कळेना अर्थात आता या वयात ते शक्य नव्हते.. नंतर मात्र खऱ्या अर्थाने आमच्या गप्पा सुरू झाल्या अनेक जुन्या आठवणी निघाल्या.
       तंत्रनिकेतनातील माझा एक विद्यार्थी बराच प्रौढ दिसे. अतिशय नम्र वागत असे. पण तो काही दिवस वर्गात दिसे तर मध्येच एकदम गायब होई.त्याची हजेरी कमी पडेल असे वाटून मी तो हजर असताना त्याला वर्ग संपल्यावर भेटायला बोलावले.तो माझ्या खोलीत आला व नम्रपणे उभा राहिला.त्याला पाहून मी " काय हो भूमकर  तुम्ही बरेच दिवस वर्गात दिसत नाही काय अडचण आहे ?"
" खरे आहे सर, माझी उपस्थिती कमीच आहे. पण माझी खरोखरच अडचण आहे.आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे मी लिट्ल फ्लॉवर विद्यालयात शिकवायला जातो व त्या दिवशी मला वर्गात हजर रहाता येत नाही."
त्याने स्पष्टपणे खरी परिस्थिती निवेदन केल्यामुळे मी त्याला शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न करून उपस्थिती सुधारण्याचा सल्ला दिला.वर्गात कमी मुले असल्यामुळे व आता व्यक्तिशः भेटल्यामुळे  तो माझ्या चांगलाच लक्षात राहिला व तोही निदान माझे वर्ग तरी कमीतकमी चुकवण्याचा प्रयत्न करू लागला.वर्षाच्या शेवटी तो बऱ्यापैकी गुण मिळवून उत्तीर्णही झाला.त्यानंतर त्याची गाठ पडण्याचा योग येईल असे वाटत नव्हते.
       त्यानंतर किती वर्षे गेली याचे स्मरण नाही.त्या विद्यार्थ्याला मी पूर्णपणे विसरून गेलो. माझ्या धाकट्या बहिणीच्या विवाहाची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून मी स्थळसंशोधन करत होतो.एका विवाह नोंदणी संस्थेत मला एक पत्ता मिळाला.त्यात तो उमेदवार जालना येथील महाविद्यालयात राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे असा उल्लेख होता.पत्ताही दिलेला होता त्याप्रमाणे मी त्या पत्त्यावर जाऊन पोचलो व दारावर टक टक केल्यावर दार उघडणारी व्यक्ती पाहून आश्चर्याचा धक्काच बसला कारण दार उघडनारी व्यक्ती म्हणजे भूमकरच म्हणजे माझा तो विद्यार्थीच होता त्यामुळे मी त्याला व त्यानेही मला ओळखले.त्याने मला आत बोलावले व थोडा वेळ बोलणे झाल्यावर मी त्याला माझ्याकडे असलेल्या स्थळाविषयी विचारले,"अहो मग हे भूमकर  कोण  ?" त्यावर त्याने " तो मीच "असे उत्तर दिल्यावर मी चाट पडलो आणि म्हणालो, "अहो पण तुम्ही तर डिप्लोमाला माझे विद्यार्थी होता आणि यात तर हे गृहस्थ राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत असे म्हटले आहे" असे मी म्हणाल्यावर"खरे आहे सर," अशी सुरवात करून त्याने सांगायला सुरवात केली.
" खर तर सर मला डिप्लोमा करण्यात रस नव्हता.पण एस.एस.सी.नंतर कमी कालावधीत पार पडेल म्हणून मी तंत्रनिकेतनात प्रवेश केला पण मला खरा रस शिक्षणक्षेत्रात व इतिहास,राजकारण,साहित्य अशा विषयातच होता त्यामुळे मी डिप्लोमा झाल्यावर काही काळ नोकरी केली पण त्याचबरोबर मी बाहेरून अभ्यास करून राज्यशास्त्रात स्नातकोत्तर पदवी घेतली,त्यानंतर मी जालना महाविद्यालयात प्राध्यापकपदासाठी अर्ज केला व सुदैवाने ती नोकरी मला मिळाली. आता मी आवडीच्या क्षेत्रात काम करत आहे." त्याच्या घरातील वडील धाऱ्यांना पत्रिका पाहून लग्न करायचे असल्यामुळे व माझ्या बहिणीची पत्रिका त्याना योग्य न वाटल्याने तीच आमची शेवटची भेट ठरली.
    अमेरिकेत व भारतातही अनेक विद्यार्थी अनपेक्षितपणे भेटतात व ओळखही दाखवतात पण अश्या काही भेटींची गंमत वाटल्यामुळे त्यांचा हा उल्लेख !