दुर्बळा मित्र कोठला ?

संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे.
वनानि दहतो वन्हे: सखा भवति मारुत:
स एव दीपनाशाय कृशे कस्याsस्ति सौहृदम्  ॥
म्हणजेच
वणव्यातिल अग्नीस वारा साह्य करीतसे
विझवी परि दीपाला दुर्बळा मित्र कोठला ?
 अग्नी वणव्याच्या स्वरुपात असताना व दिव्याच्या स्वरूपात असताना वाऱ्याचे हे असे वर्तन असते. हा न्याय दुर्बळा मित्र कोठला? या पंक्तीतून प्रकट झाला आहे.चीनने भारतावर आक्रमण केल्यास मूग गिळून बसणाऱ्या बड्या राष्ट्रांच्या बाबतीत हेच म्हणता येईल.नुकत्याच शारदा चिट फंडाच्या बातमीवरून हेच सिद्ध होते.त्यात मोठ्या पदावरील राज्यकर्तेच गुंतलेले असल्यामुळे रेल्वे भाडे किलोमीटर मागे चार दोन पैश्याने वाढवण्यास विरोध करणाऱ्या ममता दीदी त्या फंडास आर्थिक सहाय्य देणार आहेत.कारण गरीब गुंतवणुकदारांचे नुकसान व्हायला नको हे दाखवणार.तीच गोष्ट अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी ठाणे बंद ठेवण्याची! त्यातही आव आणणार गरिबांच्या कळवळ्याचाच.प्रत्यक्षात शारदा फंडात  कोट्यावधी रुपये  हडप करणारे तृणमूलचे नेते अथवा अनधिकृत बांधकामात कोट्यावधी रुपयाचा अपहार करणारे बिल्डर व त्यांचे पाठिराखे सर्वपक्षीय पुढारी याना साह्य करण्यासाठीच हा सगळा उपद्व्याप.मात्र एकादा पाच पंचवीस रुपयांची लाच खाणारा कारकून मात्र ते उघडकीस आल्यास ताबडतोब कामावरून काढण्यात येतो. कारण दुर्बळा मित्र कोठला ?
   आमच्या गृहनिर्माण संस्थेचा सचिव असताना या न्यायाचा बरेचदा मला अनुभव आला.आमच्या संस्थेतील प्लॉट्स प्रथम अगदी कवडीमोल भावाने सदस्यानी विकत घेतले पण सुरवातीस फक्त १५०० रुपयात घेतलेल्या प्लॉटची किंमत वाढू लागल्यावर विकणाऱ्यांना संस्थेने मिळणाऱ्या ज्यादा रकमेतील काही हिस्सा देणगी स्वरुपात देण्याची सक्तीच केली आणि त्याशिवाय प्लॉटचे नामांतर होऊ दिले नाही..पण नुकतेच एक सदस्य ज्यानी स्वत:च्या प्लॉटवर घर बांधले होते स्वत:चे घर बिल्डरला विकू इच्छित होते. ते सदस्य माझे शेजारी होते.बिल्डरला अर्थातच त्यांच्या प्लॉटमध्येच रस होता व त्यासाठी अव्वाच्यासव्वा किंमत मोजायला तो तयार होता.संस्थेच्य पदाधिकाऱ्यानी हस्तांतरणास विरोध केला व तशा ठरावही संमत करून घेतला पण नुकताच मी औरंगाबादला गेलो असता बिल्डरने ते घर पाडूनही टाकल्याचे  दृष्टोटोत्पत्तीस आले.अर्थातच त्याला महापालिका,शहर आखणी खाते (town planning dept.) शहर मोजणी खाते (city survey dept.) या सर्वांची मदत असल्याशिवाय हे शक्यच नव्हते.
   आमच्याच संस्थेत माझ्याच बाबतीत घडलेल्या दोन गोष्टी याच न्यायाची आठवण करून देतात.आमच्या संस्थेच्या जमिनीवर घर बांधणारे मी व माझे मित्र काळे असे आम्ही दोघे होतो.माझा प्लॉट आमच्या संस्थेच्या पूर्वेच्या सीमारेषेवर असल्याने दुसऱ्या एका गृहनिर्माण संस्थेच्या  सीमारेषेच्या जवळ होता.या दोन संस्थांच्या सीमारेषांमध्ये चार पाच फुटाचे अंतर होते.माझे घर झाल्यावर आमच्याच संस्थेच्या सदस्यांना या छोट्या रस्त्यावरून पूर्वेकडे जाता येत असे.शेजारील संस्थेतील माझ्या प्लॉटशेजारी ज्याचा प्लॉट होता त्याने घर प्रथम बांधले व त्याच्या घराचे कुंपण तो माझ्या घराच्या कुंपणाच्या आतून जाते असे म्हणू लागला.त्याच्या संस्थेच्या अध्यक्षांना बोलावून मध्ये थोडी जागा आहे असे त्याला दाखवल्यावर त्याने त्यावेळी कुंपण बांधण्याचे काम तसेच राहू दिले.त्यामुळे आमच्या संस्थेचे सदस्य त्या मोकळ्या जागेतून पूर्वीप्रमाणे पूर्वेकडे जाऊ येऊ लागले.त्या वेळी शेजारील संस्थेचे अध्यक्ष माझ्या परिचयाचे होते.
    पुढे काही दिवसांनी ते अध्यक्ष बदलल्यावर या गृहस्थाने पुन्हा आपले कुंपण बांधयास सुरवात केली व यावेळीही आपला पूर्वीचाच हट्ट कायम ठेवून त्याचे कुंपण माझ्या प्लॉटमधून नेण्याचाआपला मनोदय जाहीर केला.पुन्हा आमच्या संस्थेचे सदस्य जे त्या मोकळ्या जागेतून येजा करीत होते ,आमच्या संस्थेचे त्यावेळचे अध्यक्ष व दुसऱ्या संस्थेचे अध्यक्ष जमा झाले.यावेळी त्या संस्थेचे अध्यक्ष माझ्या परिचयाचे नसल्यामुळे आपल्याच सदस्याची तळी त्यानी उचलली.आमच्या सदस्यांनीही त्यासाठी जो पाठिंबा मला द्यावयास हवा होता तो दर्शवला नाही.निदान ज्याना त्या मोकळ्या जागेतून येजा करता येत होती त्या सदस्यांनी जर मला जोरदार पाठिंबा दाखवून बांधकाम करण्यास अडथळा आणला असता तर ते टळले असते पण त्यानी हवा तेवढा आग्रह न धरल्यामुळे अखेरीस माझ्या हद्दीतून नाही तरी माझ्या कुंपणास अगदी चिकटवून त्याने आपले कुंपण बांधले आणि त्यामुळे माझ्यापेक्षा आमच्या संस्थेच्या काही सभासदांचीच अधिक पंचाईत झाली कारण त्यानाच आता पूर्वेकडे जाण्यासाठी वळसा घेऊन जावे लागू लागले.पुढे कधी त्याना तातडीचे काम असले की ते माझ्या फाटकातून पलीकडे जाऊ देण्याची मला विनंती करत.
   पुढे पुण्यास स्थायिक व्हायचे ठरवल्यावर मी घर विकायचे ठरवल्यावर मी सुरवातीपासून संस्थेचे सचिवपद सांभाळले म्हणून देणगीचा आग्रह धरू नये अशी मी विनंती केली पण यावर सर्व सभासदांनी असा कोणाच्या बाबतीत अपवाद करता येणार नाही व ही देणगी आम्ही नव्या सभासदाकडून घेत आहोत असे म्हणून मला देणगीतून सवलत देण्यास नकार दिला.याच सदस्यांच्या नाकावर टिच्चून जेव्हा माझ्या शेजारी सदस्याने आपले घर बिल्डरला विकले तेव्हां मात्र त्याना मुकाट बसावे लागले व वात वन्ही न्यायाचा अनुभव घ्यावा लागला हा मोठाच दैवदुर्विलास असे म्हणावे लागेल.