गझल
मी कशी करणार कोणावर चढाई?
चालली माझ्यासवे माझी लढाई!
वेळ आली योग्य की, घडतात गोष्टी!
ही तुझी नाही बरी रे हातघाई!!
अस्मितेची चाड प्रत्येकास असते!
अस्मिता टिकवायला लागे धिटाई!!
बोलतो मी बोल माझ्या विठ्ठलाचे.....
मी कशी गझले तुझी मारू बढाई?
गझल लिहितो, ज्याप्रमाणे श्वास घेतो!
श्वास घेण्याला कुठे असते मनाई?
मी जरी खुर्चीत मोठ्या आज आहे;
तोच मी रे, काल जो होता शिपाई!
बालपण, तारुण्यही घाईत गेले....
आज वार्धक्यातही करतोस घाई?
नेहमी वाटायचे निवृत्त व्हावे!
आज निवृत्तीतला ना वेळ जाई!!
रोज आलेला दिवस पाहून वाटे....
चेहरा बदलून हा आला कसाई!
कोण तू? अन् कोण मी? हे जाणतो मी!
कर तुला जितकी हवी तितकी बुराई!!
मठ, न कंपू, वा कळप, काही न माझे!
मी सडा असलो तरी आहे सवाई!!
स्थान शिष्यांच्या अढळ हृदयात माझे!
हीच आयुष्यात केलेली कमाई!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१