चंदन वाटा
किती खेळलो कुदलो
माय मातीच्या कुशीत
माझ्या भाबड्या मनाचं
तिनं जपलं गुपित
माती खेळता खेळता
झालो तिच्यातून मोठा
तिच्यामधीच झिजतो
माझा चंदनाचा वाटा
जरी उतलो-मातलो
तिनं धरीलं उरास
चिलापिला समजून
तिनं भरविला घास
उभं आयुष्य फुललं
सारी तिचिच पुण्याई
जेंव्हा हुंबरला जिव
तिच झाली माझी आई
माझी नाळ तिच्या पोटी
कसा होणार वेगळा
शेवटाला भाळावर
असो मातीचाच टिळा
-उद्धव कराड. (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.