अजून आहे ठरायचे !

अजून  आहे  ठरायचे,  उरायचे  की  सरायचे
जिथे न डोळ्यांस ओलही, कशास तेथे मरायचे

मिसळुन गेलेत श्वास अन, लयीत एकाच स्पंदने
परीघही  तोच  आपला, कशास परके ठरायचे ?

पुन्हा  मनाला  छळायचे, ठरवुन  येतात वेदना
उगाच  प्रेमास  वादळी, उरी  कशाला भरायचे ?

अबोल नात्यास आपल्या, दिलेच जर नाव नेमके
मनात खोलात गोंदल्या, क्षणांस कैसे स्मरायचे ?

कशास शेरातुन हळव्या, करायची मैफिल भिजरी ?
कह्यात नव्हतेच शब्द जर, मिटून ओठा धरायचे

समोरच्याचे स्मित असले, अमोल जर जिंकण्याहुनी
खुशाल  फासे पलटुनिया, बळेच  खोटे हरायचे

कुठे  धुवांधार  यायची, मुळात  होतीच मागणी ?
कुणात  हिरवळ  तरारते, म्हणून थोडे झरायचे