काळी माय (कविता)

        काळीमाय

(वखर = कुळव, ढेकळं फोडण्याचं औजार)
जेंव्हा फिरे तिच्या उरी
माझ्या नांगराचा दात
घाव सोसुनिया उरी
पेरी सुगंध रानात
जेंव्हा तुडवतो तिला
उरी घालूनी वखर
काळ्या मातीच्या खडीनं
तिचा खुलतो पदर
जेंव्हा पेरतो मी दाणे
माय घालीते कुशीत
राब-राबताना माझा
घाम मिळतो मातीत
माझ्या गळल्या घामाला
माय घेते उदरात
ओल भरल्या उदरी
बिज येते अंकुरात
काळी माती माझी माय
काय सांगू तिची मात
मोल घेउनी घामाचं
देई सोनेरी बर्कत
                                      -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                        मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.