गझल
सतावे सारखी चणचण!
करावी मी किती वणवण?
नको हे श्वास कर्जाऊ....
कुठे माझ्याकडे तारण?
शिकवले वाळवंटाने......
कशी सोसायची रणरण!
किती मी बोचतो आहे!
किती करतात ते तणतण!!
सणाणे शेर गझलेचा!
गझल माझी जणू सणसण!!
कसा मी बातमी झालो?
पहा ती फोनची खणखण!
किती मी आडवा-तिडवा....
जगाला जाहलो अडचण!
मला पाहून मंचावर.....
कवी घेतात का दडपण?
पसरलो मी इथे तेथे.....
कसे हे आवरू गचपण?
गझलप्रतिभा न ही माझी!
मिळाले हे मला आंदण!!
खडे मखरामधे बसती!
हिऱ्यांना ना मिळे कोंदण!!
न या साध्यासुध्या जखमा!
दिले हे तू मला गोंदण!!
गझल श्वासांमधे माझ्या!
जगायाला मिळे कारण!!
उगा ना गुंफले अश्रू;
जगाला जाहले तोरण!
कुठे मी धोरणी इतका?
कळायाला तुझे धोरण!
तुझ्या झुळुकीमुळे माझे....
सकाळी दरवळे अंगण!
नको भांडूस माझ्याशी!
मला ना परवडे भांडण!!
मनाचा मळ धुण्यासाठी;
कुठे मिळतात का साबण?
गझलमय जिंदगी माझी!
तिचे मी बांधले कंकण!!
न कोणी भोवती तेव्हा.....
करे छमछम तुझे पैंजण!
फुले ऐकायला बसली!
तुझेमाझेच संभाषण!!
भुकेलेला बळीराजा....
गुरांना टाकतो वैरण!
किती कुरबूरती शायर!
तिलकधारी करा वंगण!!
विचारा प्रश्न बेताने!
अरे तो ठोकतो भाषण!!
तुझा आजार कवितेचा....
तुला घे हे गझलचाटण!
मुबारक बाटली त्याला!
जया ये लावता झाकण!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१