हिर्वा मळवट
बागायती रानामधी
ऊस ढाळीतो चवरी
हिर्वा मळवटधारी
देव नांदतो शिवारी
भाळी बाशिंग तुऱ्याचं
नटली गव्हाची ओंबी
झुळकून सखा वारा
करी तिच्यासंगे झोंबी
पात हिर्वी लुसलूशी
लाडे वेळावते मान
कांदा लाजरा-बुजरा
बसे मातीत दडून
भाजीपाला माळीवात
डुले मधीच लसुण
कुणब्याच्या घामातून
चकाकतं हिर्व सोणं
घामखुळं रान गेलं
हिर्व्या सोण्यानं मढून
कुणब्याच्या डोळा होई
देव रुपाचं दर्शन
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.