संपली स्पंदने, संपल्या वेदना!

गझल
संपली स्पंदने, संपल्या वेदना!
या मढ्याला कुठे कोणत्या भावना?

गाव मुर्दाड हे, शोधशी तू कुणा?
साद देशी कुणाला? कुठे चेतना?

साथ नाही कुणी, हात द्याया कुणी....
अन्यथा कैक माझ्याकडे योजना!

स्नेह, आपूलकी, मागुनी का मिळे?
या भिकाऱ्यांकडे का करू याचना?

तोच गोंधळ पुन्हा चौकडे सावळा!
ऐकतो आजही वांझ त्या वल्गना!!

मी व्रतस्थापरी जीव हा जाळतो!
भोगतो अन् चवीनेच या यातना!!

काम परमेश्वराचेच हातात या!
तोच कर्ता करवता.....मला कल्पना!!

केवढी दांडगाई, बढाई तुझी!
जाण, आहे कुणाशी तुझा सामना!!

देव देईल बुद्धी टवाळांस या!
रोज समजावतो मीच माझ्या मना!!

मायबोली बनो पारदर्शक पुन्हा!
हीच माझी तुला, ईश्वरा प्रार्थना!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१