ते करू देत माझी बुराई!

गझल
वृत्त: भामिनी
लगावली: गालगा/गालगा/गालगा/गा

ते करू देत माझी बुराई!
मी कशाला करू दांडगाई?

लोकहो! एवढा मी न भोळा.....
जाणतो मी बुराई भलाई!

केवढी खुमखुमी भांडणाची?
हा चढाई करे....तो लढाई!

हा नव्हे पिंड माझा खरोखर.....
मी कुणावर करावी चढाई!

कोणता लावला सांग झेंडा?
मारशी तू कशाची बढाई!

ते खुजे सर्व कंपूत होते!
पाहिली वांझ त्यांची धिटाई!!

दोन वेळेस ना अन्न कोणा!
अन् कुणी रोज खातो मिठाई!!

साधनेनेच मोठेपणा ये!
त्यास मोठेवपणाचीच घाई!!

वासरे धीट झाली कशी ही?
काय झाले दयाळू कसाई?

हा असा बंगला बांधला मी....
ओतली जीवनाची कमाई!

का स्वत:ला शहाणा म्हणू मी?
माझियाहून पोरे सवाई!

काय शिरजोर नोकर म्हणावे!
खुद्द मालक बनावा शिपाई!!

ने मला तूच वेळेत मृत्यो!
या जिण्यानेच हा जीव जाई!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१