नाव सोपे --- !

         सध्या आपल्या मुलांची नावे ठेवताना दोन महत्त्वाच्या कसोट्या लावतात असे दिसते पहिली म्हणजे ते अगदी कोणालाही माहीत नसणारे आणि शक्यतो उच्चारायला कठीण असावे  आणि दुसरी  म्हणजे त्या नावाचा अर्थ कळण्यासाठी  ते नाव ठेवणाऱ्यानाच शरण जावे  लागते. नुकतेच वाचण्यात आले की शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा या दांपत्याच्या नव्या अपत्याचे नाव त्यानी ठेवले आहे --- हो पण त्याचा उच्चार काय करायचा ते तुम्हीच ठरवा कारण त्या नावाचे स्पेलिंग Viaan असे आहे त्या अर्थी त्याचा उच्चार  विआन असा असावा असे मला वाटले.,तो वायानही असू शकतो. प्रत्यक्षात ते आपल्या चिरंजीवास कसे हाक मारतात कोणास माहीत. या शब्दाचा उच्चार  करणे  मला जमले असेल याची जशी मला खात्री वाटत नाही तसा अर्थ सांगण्याचे तर धाडसही मला होत नाही.कारण त्या शब्दाचा अर्थ मला मुळी  माहीतच नाही.तुम्हालाही माहीत असेल तर त्याबद्दल तुम्हाला नोबेल पारितोषिक द्यायला हरकत नाही.शेवटी पुन्हा आंतरजालावरच शोधले तर हिंदी भाषेतील शब्दार्थात त्यानी चक्क हा शब्द आमच्या कोषात नाही असे मान्य करून त्याला पर्याय म्हणजे Vimaan असे लिहून विमान या शब्दाचाच अर्थ दिला जो मला व आपणा सर्वांना माहीतच आहे पण त्यामुळे कुंद्रा दांपत्याचे विमान एकदम खाली येण्याची शक्यता आहे.
      सुदैवाने एका ठिकाणी त्याचा अर्थ सापडला,पण तो केवळ Viaan या शब्दाला प्रतिशब्द असा नसून त्याचा भावार्थ दिला आहे.त्यानुसार  आपल्यासभोवतालच्या लोकांना ओळखण्याची  व  गोंधळात टाकणाऱ्या निरनिराळ्या मतांच्या एकीकरणातून संबंधांचा मेळ साधण्याची क्षमता  असणारी व्यक्ती असे म्हटले आहे. हे वाचून त्यातून काहीच अर्थबोध न झाल्यामुळे  मीच गोंधळात पडतो.दुसऱ्या अर्थानुसार कुठल्याही प्रसंगास तोंड देणे व दुसऱ्यांच्या भावनांस धक्का पोचवण्याची आवड नसणे हे गुणविशेष असणारी व्यक्ती. किंवा अशी व्यक्ती की जिला मित्र लवकर मिळतात पण त्यांच्या वैय्यक्तिक बाबीत लक्ष घालणे  किंवा त्यांच्याबरोबर वाहवून जाणे आवडत नाही.किंवा ज्या व्यक्तीत आत्मविश्वासाचा अभाव आहे.आणि त्यामुळे अगदी टाळणे शक्य नसले तरच ते निर्णय घेण्याचे धाडस करतात. आणि त्यामुळे काम शक्यतो अंगाबाहेर टाकण्याचा ते प्रयत्न करतात. शारीरिक कष्ट त्या व्यक्तींना आवडत नाहीत व कामात योजनाबद्धता आणणे जमत नाही.   या नावामुळे शरीरातील द्रव  व ग्रंथी दुर्बल होतात.असाही शेरा शेवटी जोडला आहे त्यामुळे या नावाच्या अर्थापेक्षा त्याच्या उच्चाराच्या वेगळेपणामुळेच की उच्चार कसा करावा या गोंधळात पाडण्याच्या गुणधर्मामुळेच ते अधिक पसंतीस उतरले असावे असा माझा ग्रह झाला. आंतरजालावर एका ठिकाणी मात्र’ उत्साहाने भरलेला ’असा अर्थ आहे आणि तोच कुंद्रा दांपत्यास अभिप्रेत असावा.         
          बाळाच्या जन्माची चाहूल लागली की लगेच त्याच्या जन्मदात्यांना व त्यांच्या आजू बाजूच्या आप्त इष्ट व मित्रमैत्रिणींना दोन प्रश्न  सतावू लागतात .पहिला प्रश्न म्हणजे  ते नूतन बालक काय म्ह.मुलगा की मुलगी असेल ? याची उत्सुकता आता सोनोग्राफीमुळे फार काळ रहात नाही म्हणा ! त्यानंतरचा गहन प्रश्न म्हणजे त्या अपत्याचे नाव काय ठेवायचे हा ! काही लोक सोनोग्राफीच्या निकालानंतर पुढे नाव काय ठेवायचे हा प्रश्नच निकालात काढतात ती गोष्ट आणखीच वेगळी.  
         एक गोष्ट मात्र निश्चित ,नाव ठेवणे ही  बाब आता पूर्वीसारखी सोपी राहिली नाही. त्यासाठी बऱ्याच लोकांनी मोठमोठे ग्रंथ लिहिले आहेत म्हणे. साध्या लोकांसाठी छोट्या छोट्या पुस्तिकाही काढल्या आहेत आणि लोक त्या विकतही घेतात. आता तर  आंतरजालाचीच मदत घेण्यात येते.नाव साधे सोपे असणे म्हणजे कमीपणाचे लक्षण ( नाव सोपे लक्षण खोटे?)समजले जाते त्यामुळे ते कधी कधी इतके अवघड असते की मला तर अनेक वेळा नूतन अपत्याच्या मात्यापित्यास विचारून ते नाव आपल्याला खरोखरच  कळले आहे याची खात्री करून घ्यावी लागते.आणि ते कळले तरी कुंद्रा दांपत्यांच्या मुलासारखेच त्या नावाचा अर्थ काय हेही त्यांच्याकडूनच युक्ती युक्तीने काढून घ्यावे लागते.
      आमच्या वेळी म्हणजे माझ्या व नंतर आमच्या मुलांच्या जन्माच्या वेळी ही गोष्ट इतकी किचकट नसायची.मुला/लीची आत्या नामक एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती त्यावेळी उपस्थित असायची आणि इतरांनी काहीही पढवलेले असले  तरी आयत्या वेळी तिच्या मनात काय येईल त्याप्रमाणे त्या नवीन बाळाचे नाव ठरायचे. अर्थात त्यावेळी बरीच नावे ठेवण्याचीही प्रथा असे ही गोष्ट अलाहिदा !
    माझ्या बाबतीत तर माझ्याअगोदर जन्मलेली दोन मुले दगावल्यामुळे अगोदरच याचे नाव धोंड्या म्ह.धोंडिराम ठेवायचे त्यामुळे तरी हा जगेल, असे ठरलेच होते. पण पुढे म्हणजे हा आता जगला अशी खात्री झाल्यावर   "हे असले कसले नाव?" असे उद्गार आईवडिलांच्या काही परिचितांनी काढल्यामुळे की काय पण  ते नाव बदलून माझ्या वडिलांनी पूर्वीपासून त्यांच्या मनात असलेले रामदास हे नाव मला बहाल केले.पण ते आईला फारसे आवडले नसावे म्हणून त्यावर तिने "अहो हा लग्नात रामदासासारखा पळून गेला तर ?" अशी शंका भीतभीत ( हो त्यावेळी बायका नवऱ्याला चक्क घाबरायच्या पहा "उंच माझा झोका") व्यक्त केली.खरतर आता रामदासासारखी लग्न नको म्हणून लग्नातून  पळून जाणारी मुल राहिली नाहीत हे तिला माहीत नसणार असे थोडेच होते? पण कदाचित तिला "अहो याने पळून जाऊन भलत्याच मुलीशी लग्न केले तर ?" असा प्रश्न अभिप्रेत असेल. ते कसेही असो पण त्यामुळे ते बदललेले नावही बदलून सर्वानुमते माझे 'अरुण' असे नामांतर झाले पण शाळेत नाव घालेपर्यंत "श्यामच्या आई " चा बराच  बोलबाला झाल्यामुळे तेही बदलून त्याचे श्याम झाले आणि त्यामुळे माझ्या आईचेही नाव आपोआपच श्यामची आई झाले .सुदैवाने नंतर पुन्हा ते बदलण्याची बुद्धी कोणाला झाली नाही हे माझे भाग्य नाहीतर " तो मी नव्हेच " मधल्या लखोबा लोखंडे किंवा माधव काझीसारखी माझी अवस्था झाली असती.असो !
     नुकतेच सौ.च्या मामाच्याच घरी एक नातवंड (नातू) जन्मास आले.  फोनवर दोनतीन वेळा  विचारूनही  त्याचे नाव काय हे तिच्या ( पक्षी सौ.च्या) फारसे लक्षात आलेले दिसले नाही.आता तिच्या लक्षात आले नाही म्हटल्यावर तिच्या हातून फोन घेऊन आपण स्वत: विचारण्याइतके धाडस मी करू शकलो नाही,नाहीतर माझेच नाव आणखी एकदा बदलावे लागण्याची धास्ती होती, म्हणून कळेल केव्हांतरी असे म्हणून मी गप्प बसलो.शेवटी प्रत्यक्ष भेटीअंती ते "रुजुल" आहे असे कळले ते आंतरजालावरुन शोधण्यात आले होते हे उघडच होते आणि त्या शब्दाचा अर्थ "सरळ स्वभावाचा " असा आहे म्हणे.सध्या तरी तो  नावाप्रमाणे अगदीच सरळ स्वभावाचा वाटला. पहात सुद्धा तो अगदी सरळच होता कारण त्याला मान वळवताच येत नव्हती ना !
         माझ्या एका मित्राचे वडील नेहमी बढाई मारत की त्यानी आपल्या मुलाचे नाव असे ठेवले आहे जी त्याचे विडंबन कोणी करूच शकणार नाही.म्हणजे त्या काळी (आजही परिस्थिती तीच आहे)कोठलेही नाव उदा: प्रभाकर ठेवले की त्याचे मित्र त्याला प्रभ्या अशी हाक मारणार किंवा श्याम असेल तर श्याम्या, मनोज ठेवले तर मन्या वगैरे वगैरे.पण या मित्राचे नाव त्यानी ठेवले राजा.त्यामुळे त्याच्या मित्रांना त्याला झक मारत राजा अशीच हाक मारावी लागे अगदी राज्या असे विद्रुपीकरण केले तरी त्याचा उच्चार राजा असाच वाटे. पण पुढे त्यांच्या सुनेन मात्र त्यांची चांगलीच जिरवली.(नवऱ्याप्रमाणेच नवऱ्याच्या बापाचीही जिरवणारी थोर स्त्री !)ती म्हणाली ,"मी नाही राजा बिजा म्हणणार (म्हणजे अहोबिहो म्हणणे तर दूरच) ते अगदी पाळण्य़ातल्या पोराला '’अरे माझ्या राजा '’ म्हटल्यासारखे वाटते" खरे तर प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला तो पाळण्यातले पोर असल्यासारखेच वागवते हे तिलाही माहीत असणार पण ते असे उघड कबूल करणे तिला पसंत नसावे त्यामुळे लग्नानंतर तिच्या नवऱ्यावरच  नाव बदलण्याची पाळी आली. आता स्त्रीपुरुष समानतेच्या काळात स्त्रियाही असा आग्रह धरू शकतील आणि ते योग्य नाही असे कोण म्हणेल ? उलट मी तर म्हणतो त्यानी तो धरावाच !