कैक झाले जन्म माझे, का न मिळती उत्तरे?

गझल
वृत्त: देवप्रिया
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगा

कैक झाले जन्म माझे, का न मिळती उत्तरे?
धूमकेतूसारखा हा प्रश्न माझा भिरभिरे!

जाहलो निष्पर्ण त्याचे दु:ख नाही वाटले....
पालवीसाठी जगाच्या, जीव हा माझा झुरे!

रुक्ष होती माणसे ती वाळवंटांसारखी!
पाहतो त्यांच्यातही मी आज झुळझुळते झरे!!

काय अत्याचार होती, केवढा आकांत हा!
काळजाला, सांग, कोणाच्या किती पडली घरे?

मी न माझ्या वेदनांची कौतुके केली कधी!
लेखणी माझी जगाच्या वेदनांनी पाझरे!!

या न माझ्या चेहऱ्याच्या फक्त नुसत्या सुरकुत्या.....
ही अरे, मी भोगलेल्या प्राक्तनाची लक्तरे!

वय कधीही माणसाचे काय जाते झाकले?
वय किती माझे कळाया, मोज तू माझे चरे!

वृक्ष गजबजला दवाने रामप्रहरी केवढा!
सूर्यकिरणांनी उडाली बघ, दवाची पाखरे!!

ही नजर देतेच धोका, पाहिले मी कैकदा!
जे खरे नाही तयाला मानतो मी का खरे?

पुस्तके वाचून नाही माणसे कळली कधी;
वाचते वार्धक्य आता माणसांचे चेहरे!

लागली गोडी मला त्या नामस्मरणाची तुझ्या!
मोहमायेचे मला कळतात आता पिंजरे!!

हरवली माणूसकी कोठे तुझी रे माणसा ?
शोध आता काळजाचे सर्व कानेकोपरे!

मी मुलांना शिकवताना नेहमी पान्हावतो!
हे न विद्यार्थीच नुसते, हीच माझी वासरे!!

रंग जमिनीचाच मजला वाटतो आहे खरा!
जाहली पाहून, न्याहाळून सारी अंबरे!!

एक पांजरपोळ आहे माझिया हृदयामधे.....
नांदती जेथे स्मृतींची एकजूटीने गुरे!

कानफाटे काय पडले नाव माझे एकदा!
माझिया माथ्यावरी फुटतात आता खापरे!!

काय मी बोलून जातो, हे कुठे स्मरते मला?
ऐकणाऱ्याच्या कसे अंगात भरते  कापरे?

एक हाडाचाच मी शिक्षक! न मी पडतो कमी!
सरळ मी करतो मुलाला, जे कितीही वाबरे!!

एक झोपाळू तरीही, काय वांदे जाहले!
ढेकणांनी  पार झोपेचेच केले खोबरे!!

प्रीय मजला मायबोलीकर, कसेही ते असो!
वाटती काटे  गुलाबाला कधी का बोचरे?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
    फोन नंबर: ९८२२७८४९६१