कुणबी (कविता)

        कुणबी

राब-राबता कुणबी
धारा त्याच्या निढळाला
माती पिते शांतपणे
जसं प्यावं शहाळ्याला
कुणब्याच्या हातावर
फोड-घट्टे काबाडाचे
काळ्या मातीच्या पदरी
रंग हिर्व्या कशीद्याचे
असं रुजतं मातीत
त्याच्या रघताचं पाणी
रक्त येतं चकाकून
पिकातून मोत्यावाणी
कळजीचा झोका झुले
कुणब्याच्या काळजात
तान्हं पोर जसं त्याचं
पिक डोलते रानात
रास पडता खळ्यात
त्याचा जीव बिनघोर
श्वास घेतो उरी असा
जशी उजवली पोर
                                  -उद्धव कराड, (मों. नं. ९८५०६८३०४५)
                                    मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.