पगधरी (कविता)

      पगधरी

आम्ही खेडुत माण्सं
काळ्या मातीत राबतो
नित्य हाकण्यानं गुरं
बोल रांगडे बोलतो
पाणी गढूळ पाजूनी
रान हिर्वे फुलवितो
धनी आम्ही निर्माणाचे
सदा नितळ वागतो
मातीच दात्री आमुची
आम्ही मातीची लेकरं
देणेची आम्हाला ठावे
देतो फाडूनीया उर
घाम दैवत आमचे
श्रमदेवावर निष्ठा
कमाई फुकाची आम्हा
जशी पांढरीत विष्ठा
आल्या-गेल्याला वाढतो
जरी पिठलं-भाकरी
काळजातल्या मायेची
असे त्यात पगधरी  !!!
(पगधरी = निफाड तालुक्यातल्या ग्रामिण परीसरात कार्यक्रम प्रसंगी जेवणावळीच्या पंक्तीत वरण-भात, खिर अशा पदार्थांवर जी तुपाची धार वाढली जाते त्याला ' पगधरी ' म्हणतात व पंक्तीतून जे तुपाचं भांडं फिरवलं जातं त्याला ' पगधरी फिरवणं ' असं म्हणतात.)
                                  -उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
                                    मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.