श्वास माझे-तुझे एक व्हावे!

गझल
वृत्त: भामिनी
लगावली: गालगा/गालगा/गालगा/गा
****************************************

श्वास माझे-तुझे एक व्हावे!
एकमेकांत दोघे भिनावे!!

तूच ओठांत माझ्या रहावे!
लोचनांनी तुझ्या मी पहावे!!

जिंदगी एक गाणे बनावे.....
मी तुला, तू मला गुणगुणावे!

ही लडी रेशमी वेदनांची!
स्वप्नही रेशमी मी विणावे!!

चार धागे सुखांचे मिळाले.....
झालरीला पुरेसे असावे!

या गुलाबी स्मृतींच्या मिठीतच.....
जिंदगीनेच डोळे मिटावे!

    प्रेम आहे झरा उसळणारा!
काळजाला खुबीने खणावे!!

झीज सोसायला ना न माझी;
चंदनासारखे मी झिजावे!

ज्ञान द्यावे तसे ज्ञान घ्यावे!
ज्ञान घेण्यादिल्याने दुणावे!!

फूल रानातही उमलते ना!
कोण पाहो न पाहो....फुलावे!

गोड साऱ्या स्मृती ठेव मागे....
मग भलेही कुठे तू वळावे!

देव धावून येतो, पहा तू......
त्यास हृदयातुनी आळवावे!

वाट किरणे तमाला तुझी तू.......
मग भले तू किती काजळावे!

जोम पायांतही पांगळ्या या..........
दूरचा एक तारा खुणावे!

पाहिला फक्त मी खून माझा!
काय देऊ  तुम्हाला पुरावे?

पोचल्याही स्मशानात गौऱ्या!
अन् अता वाटते का जगावे

सोयरे एकदाचे पळाले....
शांत आता  शवाने जळावे!

एक पाऊस ठेव तू ध्यानी....
पावसासारखे कोसळावे!

जन्म चुपचाप मी काटला हा.....
पान गळते तसे मी गळावे!

राहिलो मी जरी ना उद्याला!
शायरीनेच माझ्या उरावे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१