साक्ष नाही, ना पुरावे, कोणता कसला न झाडा!

गझल
वृत्त: व्योमगंगा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा
************************************************

साक्ष नाही, ना पुरावे, कोणता कसला न झाडा!
न्याय मागायास गेलो, तोच झालाही निवाडा!!

पाहिजे होताच त्यांना एक कापायास बकरा....
मी तिथे जाताच पडला, भोवती माझ्या गराडा!

सोसले वैशाखवणवे, अन् झळा ग्रीष्मातल्याही!
का कळेना, सोसवेना पावसाळ्याचा उकाडा!!

लष्कराच्या भाकऱ्या तू भाज, मजला शक्य नाही!
माझिया पाठीस माझा कामकाजाचा रगाडा!!

लाड मी गेलो कराया कमवत्या माझ्या मुलांचे.....
फंड, ठेवी अन् घराचा राहत्या झाला चुराडा!

कोण गेले, काय इतका प्रीय तो होता जगाला?
भोवती त्याच्या चितेच्या आसवांचा काय राडा!

याचसाठी ठेवले पदरात त्यांनी भाट काही!
रोज ऐकायास त्यांना पाहिजे त्यांचा पवाडा!!

वेदनांना शिस्त आहे, रीत आहे, भान आहे!
रोज रात्री ठणकती त्या, ना कधी करतात खाडा!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१