जसे प्रेत माझे जळू लागले!

गझल
वृत्त: सौदामिनी
लगावली: लगागा/लगागा/लगागा/लगा
****************************************

जसे प्रेत माझे जळू लागले!
सगेसोयरेही पळू लागले!!

जरा लाभला काय एकांत हा.....
जुने दु:ख का वादळू लागले?

न मी राहिलो, त्याचवेळी जगा!
तुला, कोण मी, हे कळू लागले!!

किती थंड, निष्क्रीय गेले बहर......
शिशिर का अता सळसळू लागले?

मनाचे किती ताल सांभाळले!
मनालाच मन का छळू लागले?

दिवे जायच्या काय बेतामधे?
पहा ते कसे काजळू लागले!

मधूमेह प्रेमातला जाहला.....
चरेही अता भळभळू लागले!

तुझ्या सोबतीनेच आयुष्य हे.....
फुलासारखे दरवळू लागले!

असा काय गेलो अकालीच मी?
असे लोक का हळहळू लागले?

कळेना.....कसा आजही तू उभा?
कडे उंचही कोसळू लागले!

मला पाहिल्या पाहिल्या, लोक ते....
पहा आयुधे पाजळू लागले!

कुठे सांग, माणूसकी माणसा?
पशूही किती कळवळू लागले!

कळेना....असा काय मी बोललो?
किडे केवढे वळवळू लागले!

असा मी कुणासारखा वाटतो?
मला पाहणारे चळू लागले!

दिसे स्पष्ट अस्वस्थता रे तुझी!
समजते....तुला मळमळू लागले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
 नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे
 फोन नंबर: ९८२२७८४९६१