चिंता करतो ---- !

       एकांत स्थानी मांडी घालून बसलेल्या नारायणाने "काय करतोस रे येथे बसून?" असे विचारणाऱ्या आईला उत्तर दिले होते "चिंता करतो विश्वाची"त्या नारायणाची सर म्या पामराला कोठून येणार पण सध्या मीही विश्वाच्या अगदी छोट्या  कोपऱ्याची चिंता करतोय.या छोट्या विश्वात माझ्यासह बापूचे बरेच जवळचे मित्र आहेत.
      बापू म्हणजे माझा बालमित्र.बालमित्र या व्याख्येत पूर्णपणे गणना करता येईल असा एकमेव मित्र !माझ्याबरोबर त्याने  बिगरीपासून मॅट्रिकपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केले.गाव लहान असल्यामुळे त्याच्या व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्ती एकमेकांना ओळखत.त्याचे बहीण भाऊ माझ्या बहीण भावांबरोबर शिकले.विशेष म्हणजे प्राथमिक शाळेत त्याच्या वडलांनी आम्हा दोघांना शिकवले तर हायस्कूलमध्ये माझ्या वडिलांनी आम्हा दोघांना शिकवले.तो माझ्याबरोबर अभ्यास करण्यासाठी आमच्याच घरी निजायलाही येत असे.
    आम्ही इतका काळ बरोबर काढल्याने त्याला मी व तो मला पुरेपूर ओळखत होता.त्या काळातही मी गाणी गुणगुणत असे,तबलाही वाजवीत असे.पण त्या वेळी बापूने मात्र कधी तोंड उघडले असे मला मुळीच आठवत नाही. पं.गजाननबुवा जोशी आमच्या गावचे वैभव.त्यानी त्यांच्या गुरूच्या स्मरणार्थ गायनोत्सव सुरू केला. त्या उत्सवात मात्र बापू अगदी नियमित उपस्थित रहायचा पण कार्यक्रमाच्या शेवटी सतरंजीवर झोपलेला असल्यामुळे त्याला उठवून घरी सोडण्याची कामगिरी आम्हा दोस्तांना  करावी लागे.
    पण आता सेवानिबृत्तीनंतर  अचानक  छंद म्हणण्यापेक्षा वेडच म्हणावे इतपत त्याचा गाण्याचा म्हणजे गाणे म्हणण्याचा  रोग बळावला. आणि एकदम तो भीमसेन, जितेंद्र अभिषेकी,वसंतराव देशपांडे यांच्या  सहवासातच आणि तालमीत तयार झाल्यासारखे बोलू लागला.
     आपल्या सोसायटीमधील काही गानप्रेमी मंडळींना एकत्र जमवून त्याने एक संगीतमंडळ स्थापन केले.त्यावेळी तो केवळ कानसेन म्हणून हे करत आहे असा गैरसमज त्या मंडळीचा झाला असावा.  पण एकदम त्याने गायलाच सुरवात करून  त्यांना अपेक्षाभंगाचा जोरदार धक्का दिला त्यातही वसंतराव देशपांडे,जितेंद्र अभिषेकी अशा दिग्गजांची आणि तीही अवघड गाणी ही त्याची पहिली पसंती आहे.ती ऐकण्यापुरतीच मर्यादित ठेवण्या ऐवजी  ऐकवण्यावर त्याचा अधिक भर दिसू लागला आहे.
        त्याने तो छंद ऐकण्यापर्यंतच मर्यादित ठेवावा ही इतरांची अपेक्षा पुरी करणे त्याला मान्य नाही.त्याला माझ्याव्यतिरिक्त इतर दोस्त व श्रोते मंडळी "बापू तुम्ही सोपी गाणी निवडत जा " असा त्यांच्या दृष्टीने मोलाचा सल्ला देतात वा आग्रहच करतात म्हटले तरी चालेल,पण यावर आपल्या गाण्याची जातकुळी पूर्णपणे ज्ञात असल्यामुळे तो मोठ्या ऐटीत "त्याचे असे आहे मी फेल होणारच आहे तर मग सोपे गाणे गाऊन फेल होण्यापेक्षा अवघड गाणे गाऊन का होऊ नये?म्हणजे शिवराजांच्या मावळ्यासारखा हा बलाढ्य शत्रूविरुद्ध लढता लढता मेला असा लौकिक तरी होईल"या त्याच्या उपमेत तो फक्त एकच चूक करत असतो ती म्हणजे लढता लढता तो मरण्या ऐवजी आमच्यासारखे प्रेक्षकच बळी पडण्याची शक्यता असते.
      आता तर तो फोनवरही मला " अरे आज वसंतरावांचे हे नाट्यगीत मला फार आवडले ,मी दोन तीन वेळा ऐकून तसेच म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे.माझा प्रयत्न कसा काय जमतो ते बघ "असे म्हणून "सुजाता" चित्रपटात नायकाने  टेलिफोनवर गाणे म्हणून नायिकेच्या डोळ्यात पाणी आणले तशीच किंवा त्याहूनही अधिक हृदयद्रावक अवस्था माझी करून टाकतो. नाट्यगीतांऐवजी त्याने भावगीत म्हणावे असा सल्ला मी त्याला दिला कारण भावगीतात शब्द महत्वाचे असतात व तानांना कमी वाव असतो प्रत्यक्ष जितेंद्र अभिषेकींनीही "देवाघरचे ज्ञात कुणाला " म्हणण्यापूर्वी बरेच दिवसात म्हटले नाही प्रयत्न करून बघतो असे नम्रपणे म्हटल्याचे उदाहरण देताच "मीही प्रथमच म्हणतो आहे बघा जमतेय का ?" अशी तंबीच तो आम्हाला भरतो. वसंतराव किंवा  भीमसेन यांची नाट्यगीते म्हणताना त्यांच्यापेक्षाही अधिक ताना मारण्याचा तो प्रयत्न करतो.आपल्याला जमतात म्हणून नव्हे तर त्यानी मारल्या म्हणून ! किंवा तश्या त्यानी मारल्या नसल्या म्हणून काय झाले. मला मारायला काय कुणाच्या बापाची भीती आहे असा क्रांतिकारी विचार त्यामागे असावा..त्यामुळे त्याचे नाट्यगीत संपेल केव्हां याची वाट पहाणे एवढेच काय ते आमच्या हातात असते.
    आमच्या संगीतसभेचा कार्यक्रम संपल्यावर आमचे एक स्नेही म्हणाले,"बापू जे गाणे म्हणतात,त्याची चाल मूळ गाण्यापेक्षा वेगळीच असते." त्यावर मी उत्तरलो,"अहो त्यांचे सी रामचंद्रांच्या वडिलांसारखे आहे" हा माझा रिमार्क ऐकून ते माझ्या तोंडाकडॅच पहात राहिले "काय कळले नाही का ?" मी विचारल्यावर त्यानी "हो काहीच कळले नाही" असे म्हटल्यावर मी त्याना म्हणालो,"अहो सी.रामचंद्र यानी ""ये जिंदगी उसी की है" ची चाल आपल्याला "मूर्तिमंत भीति उभी" या "शारदा" नाटकातील पदावरून सुचली असे म्हटले.त्यावर काही संगीत व नाट्यप्रेमी सी रामचंद्र यांच्याकडे जाऊन विचारु लागले,"अण्णासाहेब,तुम्ही शारदा नाटक पाहिले आहे का?" सी.रामचंद्रांनी ते बघितलेच नव्हते पण त्यानी तसे प्राजळपणे कबूल केले पण त्याचबरोबर ते गाणे मात्र आपण ऐकले आहे असे त्यानी म्हटल्यावर आलेल्या नाट्यप्रेमी पैकी एकाने "मूर्तिमंत"ची चाल म्हणून दाखवली आणि "तुमची चाल अशी नाही" असे म्हणल्यावर सी.रामचंद्र यांना ते मान्य करावे लागले.पण ते पुढे म्हणाले,"खरे तर माझ्या वडिलांना गाण्याचा नाद व त्यानी "शारदा" नाटक पाहून आल्यावर ज्या चालीत ते "मूर्तिमंत भीती उभी" गुणगुणले त्यावरून मला "ये जिंदगी " ची चाल सुचली. बापूंचे हे असेच आहे त्यामुळे त्यांची चाल मूळ गाण्याप्रमाणेच असेल असे नाही"  यावरर मित्रानी मान हलवली.
    त्यामुळे त्याचा फोन आल्यावर आज तो फोनवर काय ऐकवणार आहे याविषयी विचार करून माझ्या काळजाचे पाणी पाणी होते. तरीही मित्रकर्तव्य म्हणून मला त्याला कान द्यावाच लागतो.पण आज त्याने एकदम सिक्सरच मारला,"काय चाललेय?" अस त्याने उपचार म्हणून विचारले कारण माझे काहीही चालले असेल तरी  ते थांबवून मला एकादी गत ऐकवून माझी काय गत होते ते पहाण्याच्या निश्चयानेच त्याने फोनला हात घातलेला असतो.पण आज जरा वेगळाच रंग होता. त्याचा आवाज जरा अवघडलेला वाटत होता.आणि त्याने जे सांगितले त्यामुळे मीही अगदी कोमातच जाण्याच्या मार्गात होतो कारण त्याने ,"अरे एक गंमतच झाली ----"अशी सुरवात केली.आमचे एक शिक्षक होते त्याना कोणत्याही वाक्याची सुरवात "गंमत अशी की--"ने करण्याची संवय होती.मग ती बातमी एकाद्याच्या परलोकी जाण्याचीही असेना का !त्यांची नक्कल करता करता त्यालाही तीच संवय लागली होती.अर्थातच जिवाचा धडा करून त्याची गंमत ऐकण्याची मला मानसिक तयारी करावी लागली.
   "तर गंमत अशी की " त्याने पुन्हा सुरवात केली."ते सोनटक्के माहीत आहेत ना ?"मला माहीत नसल्यामुळे मी मुकाट्याने तसे कबूल केले. " अरे  ते स्वागत हॉलचे मालक,माझ्या जरा परिचयाचे आहेत."बापूचा लोकसंग्रह दांडगा आहे.त्याच्या सहवासात येणाऱ्या कोणाही व्यक्तीवर तो अगदी थोड्या अवधीत आपले संभाषण जाल टाकून त्याला आपलासा करून टाकतो त्यामुळे सोनटक्के यांनाही त्याने गुंडाळले असल्यास नवल नव्हते."तर गंमत काय झाली --- "त्याने संभाषण पुढे चालू करत सुरू केले,"तुला माहीतच आहे हल्ली मी वेळ मिळेल तेव्हां आणि कोठेही माझे गायन सुरू करत असतो.आपल्याला काय ,कोणी ऐकायला हवेच असे नाही.तर हे सोनटक्के त्यादिवशी माझ्याजवळ बसले होते आणि असेच मी गाणे म्हणत होतो.तश्यात मी सोनटक्क्यांना म्हणालो,असेच गाणे म्हणायची हौस मला भागवावी लागते.नाहीतर एकाद्या हॉलमध्ये मित्राना बोलावून माझे गाणे ऐकवण्याची खरतर मला इच्छा आहे.’
    अशी इच्छा खरोखरच बापूने आम्हा मित्रांच्या समोर एकदा व्यक्त केली होती तेव्हां आमच्यापैकी एका जरा वात्रट मित्राने "तशी तुझी एकादी मैफिल करायला हरकत नाही फक्त इतरत्र गायकाला बिदागी देऊन बोलावण्यात येते तुझ्या मैफिलीसाठी आम्हा श्रोत्यांना काहीतरी बिदागी देऊन बोलवावे लागेल असा ताशेरा मारला.अर्थात त्यावरही बापूने खूष होऊन त्याला टाळी दिली कारण आपल्या गायनाचा त्यालाही आवाका माहीत होता.मात्र सोनटक्क्यानी त्याचा अगदी वेगळ्या पद्धतीने अपेक्षाभंग केला आणि आपल्या जवळ असलेली दैनंदिनी चाळत थोडावेळ त्यातील पाने उलटसुलट करत ते म्हणाले," काही हरकत नाही, गुरुवारी संध्याकाळी पाच ते साडेसहा या वेळात तुमचे गायन स्वागत हॉलमध्ये ठेवूया.चालेल ना?"आता मात्र बापूची बोलतीच बंद झाली पण तो कोणत्याही परिस्थितीत हार मारणारा आणि डगमगणारा गृहस्थ नसल्यामुळे लगेच त्याने ती वेळ आपल्या कार्यक्रमासाठी मुक्रर करण्यास होकार देऊन टाकला.
    त्यासाठीच त्याने मला फोन केला होता.मी त्याला तबल्याची साथ करावी व कार्यक्रमाचे निवेदनही करावे असा त्याचा प्रस्ताव होता. मित्रकर्तव्य म्हणून मला ते करणे आवश्यक आहे असे मला वाटत होते पण कार्यक्रमास मिळणाऱ्या प्रतिसादास तोंड देण्यास बापूसारखा मी निर्ढावलेला नसल्यामुळे मी जरा त्या कामास " अरे नुकताच केरळ यात्रेवरून आल्यामुळे माझी कंबर दुखत असल्यामुळे इतका वेळ बसून तबला वाजवणे मला जमेल की नाही याविषयी शंका वाटते.पण मी कार्यक्रमास निश्चित येईन "असा नकारात्मक दिलासा दिला. पण अश्या सबबीकडे लक्ष दिले तर तो बापू कसला ."ते काही नाही तुला आलेच पाहिजे,हा माझा हुकूम समज.  त्यावर मला काही नोलून ते टाळने शक्य नव्हते.
   आमचे नेहमीचे हार्मोनियमवादक श्री.काळे यांना मी फोन करून विचारले."कायहो बापूचा फोन तुम्हाला आला होता का?"त्यावर त्यांचे अपेक्षित उत्तर आले,"हो , त्यानी मला त्यांच्या गाण्यासाठी साथ करण्यासाठी विचारले.पण मी नाही म्हणालो"हेही काळ्यांकडून अपेक्षितच होते. त्या कार्यक्रमाविषयी आमच्या दोघांचे मत मिळतेजुळते होते कारण ते पुढे म्हणाले,"अहो आपल्या संगीतमंडळाचे ठीक आहे पण स्वागत हॉलमध्ये जमणारी माणसे बापूंचे गाणे कितपत ऐकून घेतील शंकाच आहे"त्यावर कडी करत मी म्हणालो,"म्हणजे गाण्याच्या शेवटपर्यंत आपण साथिदार व सतरंजीवाला एवढेच रहायचो."
"नाहीतर काय, पण बापूंनी शेवटी माझ्या गळ्यात माळ घातलीच." काळे म्हणाले.
     म्हणून आता मला काळजी पडली आहे की आम्ही दोघेजण आणि बापूंने गळ घालून बोलावलेले रसिक जन यांचे कसे होणार याची !
म्हणून प्रारंभी म्हटल्याप्रमाणे "चिंता करतो-- या विश्वाची !"