वृत्त: वियद्गंगा
लगावली: लगागागा/लगागागा/लगागागा/लगागागा
**************************************************
तुला या बंद डोळ्यांनी पहावे, हात जोडावे!
दिपावी लोचने माझी, दिसावे दिव्य देखावे!!
तुझे लावण्य वर्णाया, पडे ही तोकडी भाषा......
थिटी प्रत्येक उपमा, मी, कळेना काय बोलावे!
तुझी दुनिया, तुझे रस्ते, तुझी छाया, तुझे थांबे!
वळावे की, सरळ जावे? कुठे मी सांग थांबावे?
नसे ही लेखणी साधी, तुझा हा कुंचला आहे!
तुझे मी रंग घ्यावे अन् तुझे मी चित्र काढावे!!
नभाचे छत, दिशा खिडक्या, क्षितिज हे उंबरा ज्याचे....
असे स्वप्नातले घरटे, अता सत्यात उतरावे!
मनाच्या खोल डोहाच्या तळाशी पोचता यावे!
विचारांचे अलौकिक धन कधी हातास लागावे!!
अरे, त्या वेदना खोट्या, किती ते बेगडी टाहो!
भराया तुंबड्या ते लोक करती काय कांगावे!!
तुझी स्वप्ने, तुझी इच्छा, तुझी मर्जी, तुझी आज्ञा!
जगाने जाणुनी घ्यावे, तुझ्या रंगात रंगावे!!
मलाही लागली येऊ करायाला तुझी भक्ती!
मला दे एवढी शक्ती, तुझे मी शब्द पाळावे!!
पिढी ही आंधळी आहे, सुखामागेच का धावे?
सुखाच्या पाठलागाने कशाला दु:ख मिळवावे!
नका मज थांबवू येथे, नका मज अडकवू येथे!
मला त्या पैलतीराचे किती आलेत सांगावे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१