गझल
वृत्त: मृगाक्षी
लगावली: लगागागा/लगागागा/लगागा
**************************************************
सुखांची सावली काही क्षणांची!
परंतू साथ दु:खांची युगांची!!
कसे वठले पहा माता-पिता ते.......
किती चिंता बिचाऱ्यांना मुलांची!
किती सत्कार हे आपापल्यांचे!
कशी झाली पहा दैना फुलांची!!
कुठे चुकले विचारायास गेलो......
दिली त्यांनी मला यादी चुकांची!
स्वत:साठी न हे डोळ्यात पाणी......
तरळती आसवे ही दु:खितांची!
उगा ना पावले सोडून गेलो.......
पिढ्यांसाठीच दौलत पावलांची!
दुतर्फा वृक्ष डेरेदार सारे.....
तरी वाटेस तृष्णा सावल्यांची!
मते मागून ते निवडून आले!
गरज त्यांना न आता पामरांची!!
निहाळे ही धरा भेगाळलेली......
नभामध्ये किती दाटी ढगांची!
बरा वैशाख माझ्या वेदनांचा!
नको बरसात आता सांत्वनांची!!
विठू कोठे उभा आहे, न पत्ता!
कुठे झुंबड उडाली पालख्यांची!!
अनाहत नाद म्हणती, हाच का तो?
गुटरगू वेदनांच्या पारव्यांची!
किती ही हिंस्र वृत्ती, पाशवीपण!
पशूंना लाज वाटे माणसांची!!
घरांना घरपणा उरलाच कोठे?
किती अदृश्य ही पडझड घरांची!
मुलांची काळजी घेवून झाली!
अता मज काळजी त्या नातवांची!!
न मुलगी, पोटचा गोळा दिला मी!
मुलीसम काळजी घेतो सुनांची!!
किती चुपचाप मी गेलो फसवलो!
न झाली वाच्यताही वंचनांची!!
न टाहो, हुंदके, नाही उसासे!
कुठे आरास केली वेदनांची?
जणू पालाच पाचोळा अता मी!
न पाचोळ्यास भीती वादळांची!!
जगाला पाहिजे ते तेच केले!
गरज पडली न मज संभाषणांची!!
कुठे लक्षातही आश्वासने ती?
अता झाली सवय त्या वल्गनांची!
उभा हा जन्म काळोखात गेला......
न येते याद आता चांदण्यांची!
कितीदा वार झाले पाठमोरे!
न पडली थाप केव्हा कौतुकांची!!
भरारी घेतली राखेतुनी मी!
अता भीती न उरलेली विजांची!!
कसे गझलेत ओघळतात अश्रू?
जणू पेनात शाई आसवांची!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१