गझल
वृत्त: ?
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा/लगालगा
**************************************************
मनात आले, लगेच केले, असे कधीही करू नये!
विचार येतो, विचार जातो, उगाच भिरभिर फिरू नये!!
दिसावयाला वरून दिसतो भले किती थंडगार तो.....
कधीच हातामधे कुणीही असा निखारा धरू नये!
बघून ऐपत, कुवत स्वत:ची, अशीच स्वप्ने पहात जा!
उगाच भलती बघून स्वप्ने, मनातुनी तू झुरू नये!!
प्रसन्नता सूज्ञ माणसांची उगाच नाही अशी टिके......
कुणी किती वाकडे तुला बोलले तरी ते स्मरू नये!
जगात सौजन्य आज सुद्धा टिकून आहे....न थोडके!
मुळात सज्जन म्हणून कोणासही कुणी वापरू नये!!
दिसावयाला असेल सुंदर, भले कितीही, गुन्हा न तो!
असे स्वत:च्या सजावटीला कुणासही कातरू नये!!
असो कुणीही, तुझ्या नि त्याच्या मधेच ईश्वर उभा असे!
पुढ्यात माणूस कोणताही असो, कधी घाबरू नये!!
असेल पोटात, तेच ओठामधे तुझ्या नेहमी असो!
मनातले स्पष्ट बोलताना, मधे कधी चाचरू नये!!
कधीच वाटेमधे कुणाच्या, कुणीच अडचण बनू नये!
उगाच कोठे तरी पथारी मधे अशी अंथरू नये!!
न तो जरी बोललाच काही, शिव्याच देईल आतुनी!
घरात बसवून पाहुण्याला कधीच घर आवरू नये!!
जिथे जरूरी असेल तेथे जरूर ये-जा करीत जा!
नकोच आहे जिथे कुणाला, तिथे कधी वावरू नये!!
मनामधे पोकळ्या तशाही कमी कुठे पाहिल्यात का?
उगाच चाळा म्हणून कोणी मनास त्या पोखरू नये!
भले कितीही असेल गुंता, घिसाडघाई करू नये!
असेल जर सोबती सबूरी, कधीच तू गांगरू नये!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१