कधी पाऊल हे माझे कुठे घोटाळले नाही!

गझल
वृत्त: वियद्गंगा
लगावली: लगागागा/लगागागा/लगागागा/लगागागा
****************************************************

कधी पाऊल हे माझे कुठे घोटाळले नाही!
कुणाच्या सोबतीसाठी, कुठे रेंगाळले नाही!!

स्तुती, निंदा करो कोणी, कुणी शाबासकी देवो.....
कुणालाही कशासाठी कधी ओवाळले नाही!

असे नाही, न झालेली वसंताची कधी ये-जा;
परी माझेच अंगण हे कधी गंधाळले नाही!

हुरळलो ना सुखांनी मी, न दु:खांनी कधी खचलो....
असू दे फूल वा काटे....उरी कवटाळले नाही!

उभे आयुष्य प्रश्नांचे भिजत हे घोंगडे पडले......
मला टांगूनही झाले, कधी ते वाळले नाही!

कधी मी हातचे राखून काही ठेवले नाही....
असू द्या काम कुठलेही, कधी गुंडाळले नाही!

अधूऱ्या सर्व स्वप्नांचे बनवले एक गाठोडे!
धिटाई यायची आहे, म्हणोनी जाळले नाही!!

सरळ डोळ्यामधे बघुनी सवय बोलायची मजला;
असो तो दोस्त वा दुश्मन, कुणाला टाळले नाही!

उभा अद्याप वळणावर, तुझ्या वाटेकडे डोळे......
शपथपूर्वक दिलेले तू वचन का पाळले नाही?

दिले तू पात्रतेपेक्षा अधिक मजला, खरे आहे!
निगूतीने परी ते मी कधी सांभाळले नाही!!

भले सुस्तावला रस्ता, जरी थकला किती रस्ता;
तरी हे पांगळे पाउल, कधी कंटाळले नाही!
 
जरी नाना तऱ्हेने ते मला डिवचून गेलेले.....
किती सोशीक मन माझे कधी चवताळले नाही!

कसे वागेल कोणी ते, कुठे हातामधे असते?
मनाजोगे जरी नसले तरी हेटाळले नाही!

दिले तू वावरू येथे, तुझे उपकार हे दुनिये!
जरी ना भावलो कोणा, कुणी फेटाळले नाही!!

न याचे दु:ख की, मजला कुणीही वाचले नाही!
मला हे दु:ख की, साधे मला तू चाळले नाही!!

कसा त्यांना रुचावा मी? सुगंधाचे घराणे मी!
शहर ते कागदी होते, कुणी मज माळले नाही!!

अरे, रस्त्यात भरदिवसा, कसे लुटतात ते अब्रू?
उरी या षंढ दुनियेच्या कधी फेसाळले नाही!

जगाचे बोलणे होते, तसे मीही रिचवले ते!
मनाला सोसण्यासाठी  कधी ते गाळले नाही!!

पुढ्यामध्ये जसे आले, तसे स्वीकारले मीही!
नवे पर्याय कुठलेही कधी चोखाळले नाही!!

मनाचा पिंड हा नव्हता.... कधीही दावणी तोडा!
कधी ते हात सोडोनी, कुठे बोकाळले नाही!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१