ऐन माध्यान्ह अन् सूर्य हा का ढळे?

गझल
वृत्त: स्रग्विणी
लगावली: गालगा/गालगा/गालगा/गालगा
******************************************

ऐन माध्यान्ह अन् सूर्य हा का ढळे?
कोणती सावली या उन्हाला गिळे!

लागले ना स्मशानामधे न्यायला......
बिनसरण, बिनचिता प्रेत माझे जळे!

काय गेलो अकाली अरे, एवढा?
आज जो तो कसा एवढा हळहळे!

मी दिसाया जरी वादळी वाटतो;
आत माझ्या सदा शांतता झुळझुळे!

काफिये अन् रदिफ, ही निमित्तेच रे.....
शेर हृदयातुनी माझिया सळसळे!

केवढी आर्द्रता दोन मिसऱ्यांमधे!
वाटते काळजाची जखम भळभळे!!

कैक शायर पहा धडपडू लागले....
हात त्यांनाच देण्यास मन तळमळे!

भुलभुलैय्ये तुझे, भूलथापा तुझ्या....
डाव प्रत्येक आम्हास आता कळे!

शब्द भात्यातला बाण आहे....समज!
लागतो ज्यास तो, केवढा कळवळे!!

ही निसर्गातली संकटे का कमी?
माणसा, तू नको माजवू वादळे!

माणसांचे कडे....माणसांच्या दऱ्या....
उंच कोणी चढे, तर कुणी कोसळे!

कोण करणार रे, स्वच्छ सूर्यास या?
रोज तळपून तो केवढा काजळे!

माणसांचेच भय माणसाला किती!
आज जो तो असा शस्त्र का पाजळे?

रोज आभाळ हे का असे फाटते?
रोज माणूस वृक्षांपरी उन्मळे!

वाट दिसते सरळ फक्त लांबून रे....
वाट कुठली असो, नागमोडी वळे!

लावतो दार, खिडक्या मनाच्या तरी....
आज वारा स्मृतींचा मनाला छळे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१