'काही असे नव्हतेच', म्हणाली...

'काही असे नव्हतेच',म्हणाली,
पुन्हा पुन्हा ती तेच म्हणाली.
ओठांनी जरी हेच म्हणाली...
डोळ्यांनी भलतेच म्हणाली.

स्वप्न असते तुटण्यासाठी,
आणि गाठी या सुटण्यासाठी,
नावापुरते गाव प्रीतीचे,
असे काही नसतेच म्हणाली.

विसरेन असे ती म्हटली नाही,
नि आठवशील असेही काही...
आठवांचे कढ गिळून ती
विसरून जा इतकेच म्हणाली.

म्हणत राहीली जाते.. जाते,
उगाच जडले आपले नाते,
घट्ट तरीही हात धरून ती
हसून जरा उसनेच म्हणाली...

'काही असे नव्हतेच',म्हणाली,
पुन्हा पुन्हा ती तेच म्हणाली...