अहो चहा घेताय ना? (कथा)

"अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा अंघोळीला."
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करून दिली.
कॉलेज मधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठीक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने.
विनायक बॅंकेत मॅनेजर होता. मात्र मागील वर्षी त्यानेही नोकरी सोडली होती. कारण होतं दोघांच्या आजारपणाचं. त्याचीही तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. कमी झालेलं वजन, खोल गेलेले डोळे, दडपणाखाली असल्यासारखा, तरीही सुजातासमोर आनंदी असल्यासारखा वावरायचा. मात्र.. तो आतून खूप खचला होता. दिवस-रात्र एकच चिंता त्याला खात होती – आपल्यामागे सुजाताचं कसं होणार?
"अहो घेताय ना चहा? सकाळपासून दोनदा केला, पण अजून एकदाही घेतला नाहीत." सुजाताने पेपरचं पान उलटलं.
एव्हाना विनायक बाथरूम मधून बेडरूममध्ये गेला होता.
आता मात्र हद्द झाली ह्यांची असं म्हणत सुजाता पेपर तसाच टेबलवर ठेवून उठली. बेडरूमपाशी येऊन दारावर टकटक करू लागली.
"अरे का मला बापडीला त्रास देतोयस तू? नाही सोसत रे मला आता दगदग. ऐक ना."
इतरा वेळी 'अहो-जाहो'' करणार्‍या सुजाताचा स्वर क्वचित प्रसंगी ‘अरे-तुरे’ वर यायचा. विनायकलाही ते आवडायचं. त्यामुळे प्रेम, हक्क वाढल्यासारखा वाटतो असं त्याचं म्हणणं. बाकी प्रेमाशिवाय त्यांच्या संसारात दुसरं कुणीच नव्हतं. ना मूल, ना बाळ. त्यामुळे दोघंच एकमेकांचं सर्वस्व होती. दोघही अगदी रसिक. संगीत, नाटक, सिनेमासाठी हटकून वेळ काढायची. विविध विषयांवर चर्चा पण रंगतदार असायची.
मागील काही महिने मात्र घर उदासतेने भरलेलं. पूर्वीचा रसरशीतपणा आता पार सुकलेला. पूर्वीची रसिकता पार नायनापाट झालेली.
"हो. कपडे करायला वेळ तरी दे. दार उघडच आहे."
सुजाता आत आली. विनायक आवरत होता.
"किती वेळ रे."
"तू घेतलास का?"
"तुझ्याशिवाय? एकटीने? कधी घेतलाय का?"
"हं. आता सवय क…" उर्वरित वाक्य त्याने गिळून टाकलं.
"काय?" कपाळावर आठ्या आणत सुजाताने विचारलं.
"काही नाही. चल मी आलो." केसांवर कंगवा फिरवत विनायकने प्रश्न टाळला.
सुजाता बाहेर येऊन आरामखुर्चीवर बसली. तिला अस्वस्थ वाटू लागलं, कदाचित विनायकच्या बोलण्याने असावं.
ती तशीच डोकं मागे टेकवून निपचीत पडून राहिली. समोर त्यांच्या लग्नानंतर काढलेल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोची फ्रेम होती. तिच्या चेहर्‍यावर एकदम स्मित आलं, डोळे मिटून ती मागील पाने चाळायला लागली.
'फर्ग्युसन कॉलेज बाहेरील ते चहाचं दुकान. तिथे नेहमी येणारा विनायक आणि समोरच आमचा वाडा. काय दिवस होते ना सुंदर! पंचवीस-तीस वर्षं होत आली पण आजही आठवणी एकदम टवटवीत आहेत!
कितींदातरी विनायक तिथेच दिसायचा. तेव्हापासून हे चहाचं वेड.’
सुजाताच्या चेहर्‍यावर हास्याची रेघ उमटली.
पुढे डिग्री घेतल्या घेतल्या घरच्या संमतीशिवाय लग्न. काय ना आई बाबा पण, आधी खपवून घेणार नाही म्हणून सांगितलं आणि लग्नानंतर काही वर्षातच दादा इतका जवळचा वाटू लागला त्यांना विनायक. पण माझं लग्नात नटणं, सजणं राहीलच ना.’
सुजाताला आजही त्या गोष्टीची हुरहुर होतीच.
'पुढे पुणे सोडून नोकरीसाठी मुंबईला काय आलो आणि इथलेच झालो.
नवा मित्रपरिवार मिळाला. वेळोवेळी त्यांनी खूप सपोर्ट केलं. गरज पण होतीच म्हणा कुणाच्या ना कुणाच्या सपोर्ट्ची, संकटं म्हणून तरी काय कमी आली का. बिचार्‍या विनायकने खूप खूप सोसलं. माझ्या अचानकपणे आलेलं वांझत्वाचा पण किती मोठ्या मनाने स्वीकार केला त्याने. त्याची तर किती स्वप्न होती, पण माझ्या नशिबामुळे….
त्यात मागील दोन-तीन वर्षांत डॉ. पंडितांकडे वाढलेल्या चकरा… ते कमी होतं म्हणून की काय, त्यात ह्या दम्याच्या त्रासाची भर.
किती म्हणून मनस्ताप होतोय विनायकला. आणि त्यात गेल्या वर्षी…’
सुजाता एकदम सुन्न झाली.
'एकवेळ जे मी सोसतेय ते आनंदाने आयुष्यभर सोसलं असतं. पण…’
आणि सुजाताला त्या काळ्या दिवशीचे डॉ. जयकरांचे शब्द आठवले.
'बातमी तितकीशी चांगली नाही. माझा संशय खरा ठरला. रिपोर्ट्स पण तेच सांगतायत. तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे. डगमगून जाऊ नका. जेवढं शक्य आहे, करूच आपण. पण… पण दुर्दैवाने सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.’
'विनायकने कोणाचं वाईट चिंतलंही नाही, करणं तर दूर राहिलं आणि त्याला ब्लड कॅन्सर. माझ्या विनायकला… तो पण लास्ट स्टेजला. फक्त काही महिने…’
तिने डोळे उघडले, त्यातील शक्ती नाहीशी झाल्यासारखी. नजर पूर्ण हरवली होती.
'आयुष्यभर सुख दुःख एकत्रित भोगली, मग हा त्रास एकट्या विनायकलाच का? का… का मृत्यू आपल्याला आपल्या माणसांपासून दूर करतो? तो सुद्धा एकत्र भोगता आला असता तर…’
तिचे डोळे पाणावले. पापण्यांची उघडझाप करत ते बाहेर येणार नाहीत ह्याची काळजी घेत ती पुन्हा बेडरूममध्ये आली.
विनायक पलंगावर शांतपणे पडला होता.
"अहो चहा घेताय ना?" तिने खालच्या आवाजात विचारलं, जेणेकरून तो झोपलाच असेल तर त्याची झोपमोड होणार नाही.
तिची चाहूल लागल्याने त्याने वळून पाहिले आणि कुशी पलटत विचारले "काय म्हणालीस?"
"चहा घेतोस?"
"हो चालेल, चहाला काय आपण कधीही तयार." म्हणत तो उठून बसला.
सकाळपासून दोनदा केला, एकदाही घेतला नाही, किती मिनत्या केल्या, आणि आता म्हणे कधीही तयार. विनायकसुद्धा ना…
ती बेडरूमबाहेर पडू लागली.
'ह्याने अजून गोळ्याही घेतल्या नसणार’ ती पुन्हा मागे वळली आणि बघते तर…
विनायक पलंगावर नव्हता. पलंग पूर्ण रिकामा. बेडरूममध्ये कुणीही नव्हतं.
ती गडबडली, गोंधळली.
'मला परत भास झाला की काय?’ पुटपुटत बाहेर आली.
'तुम्ही खूप विचार करता. एखाद्या गोष्टीवर तेवढा विचार करायची गरज नसते, तरीही. जे समोर चालू आहे ते तुमचे डोळे पाहत असतात, मात्र त्याचवेळी मेंदू बॅकग्राऊंडला इतर कोणत्यातरी विचारात व्यग्र असतो. डोळे जे चित्र मेंदूपर्यंत पोहोचवतात त्याच इंटरप्रिटेशन करणं, तसंच चालू असलेले विचार ह्यांचा गुंता होतो आणि मनात जे विचार चालू आहेत ते आपले डोळेच बघतायत असा आभास निर्माण होतो.
मेडिकली याला आम्ही ‘टॅक्टिल हॅल्युसिनेशन’ (tactile hallucination) म्हणतो. कामाचा ताण, फ्रस्ट्रेशन, चिंता, आनुवंशिकता बरीच कारण असू शकतात. हल्लीच्या काळात सर्रास अशा केसेस मिळतात. काळजीचं कारण नाही.’ – डॉ. पंडितांनी विनायक आणि सुजाताला समजावलं होतं दोन वर्षांमागे.
सुजाताला नियमित औषधं पण चालू होती तरीही अधेमधे भास व्हायचाच. त्यामुळे भास झाल्याचं जेव्हा तिला ते जाणवायचं तेव्हा ती लगेच सावरायची, नॉर्मल व्हायचा प्रयत्न करायची.
आज मात्र तिला जरा विलक्षण वाटलं.
'म्हणजे विनायक अजून आलाच नाही अंघोळीहून?’ ती संभ्रमित झाली.
'जेव्हा असं काही होईल, तेव्हा काही विचार न करता शांत चित्ताने थोडावेळ बसून किंवा पडून राहा. आणि झाल्या प्रकारावर अजिबात विचार नको. इट्स डेंजरस.’
डॉ. पंडितांचा सल्ला तिने लगेच अमलात आणला.
आरामखुर्चीवर शांत पडून राहिली. डोक्यातील सगळे विचार बाहेर काढले. सगळी विचारचक्र थांबवली.
तिच्या नेटाच्या प्रयत्नांना थोडं यश आलं. थोड्यावेळासाठी तिचा डोळा लागला.
"सुजाता, अगं चहा देतेस ना? झाली माझी अंघोळ."
तिला खडबडून जाग आली.
विनायकचा आवाज हा भास नाही ह्याची खात्री करण्यासाठी तिने उलट प्रश्न केला "काय म्हणालास विनायक?"
ती खुर्चीला पाठ न टेकवता अधीरतेने विनायकच्या आवाजाची वाट पाहू लागली.
पण निरव शांततेशिवाय काहीच प्रतिसाद नाही.
जाऊन नक्की काय प्रकार आहे हे पाहायची तिची हिंमत होत नव्हती.
काय होतंय आज असं मला? बधिरता आलीय डोक्याला. आपल्याला नक्कीच विनायकच्या आवाजाचा भास झाला याची खात्री सुजाताला पटली.
तिने खुर्चीला पाठ टेकवली आणि स्वस्थ पडून राहिली.
काही क्षणांतच पुन्हा एकदा विनायकचा आवाज आला "अगं चहा दे."
तिने खाडकन डोळे उघडले. गडबडीत उठून बेडरूममध्ये आली. विनायक देवासमोर हात जोडून उभा होता. देवासमोर पेटतं निरंजन होतं.
म्हणजे इतका वेळ त्याने उत्तर दिलं नाही त्या अर्थी तो जप करत असणार. अंघोळीनंतर जप करण्याची सवय होती त्याची.
सुजाताला आत्मविश्वास आला. म्हणजे हा भास नव्हता तर!
"आज काही खरं नाही माझं." असहायपणे सुजाता म्हणाली.
"का? काय झालं?"
"मला वाटलं आज मला पुन्हा भास झाला की काय?"
"पुन्हा म्हणजे?" अंगात शर्ट चढवत विनायकने विचारलं.
"मघाशी हो, तुम्ही पडला होतात आणि मी तुम्हाला चहा विचारायला आले होते, तुम्हाला औषध घ्यायची आठवण करायला परतून पाहते तर तुम्ही…"
"तू गोळी घे बघू आधी. चहा नंतर दे."
"मी घेते हो, मघाशी जी आठवण करायला आले होते ते आधी करा. तुम्ही आधी घ्या गोळ्या ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि उद्या जायचंय जयकरांकडे आहे ना लक्षात?"
"हो गं बाई. एक काम करू, जयकरांची अपॉइंटमेंट मी बदलून परवाची घेतो. तुझ्या दम्याच बघ मला टेन्शन आलंय. वाढलाय हल्ली. उद्या आधी ते निस्तरू. काय ना, आजारांची नुसती व्हराईटी आहे."
विनायकने तेवढ्यात एक विनोद करून सुजाताला हसवण्याचा प्रयत्न केला.
सुजाता चहा करायला किचनमध्ये आली. काही विचारात असल्यासारखी होती.
"नको, आपण उद्याच जायचं जयकरांकडे, दमा बरा आहे तसा. मी निभावू शकते."
विनायक यावर काहीच बोलला नाही.
"अहो ऐकताय ना? मी काय म्हणते?"
विनायकचा आवाज नाही. सुजाता बिथरली. तिच्या श्वासांचा वेग वाढला.
"विनायक अहो बोला काहीतरी…" पण कोणाचीच चाहूल नाही.
थबकत थबकत बेडरूममध्ये आली पण तिथं कुणीच नव्हतं.
ती पूर्ण ढासळली. देवासमोर हात जोडून उभी राहिली. लक्ष गेलं तर समोरचं निरंजनही शांत होतं. तिने बाथरूमही उघडून पाहिलं पण विनायक नव्हता.
हे जरा जास्तच होतंय. पण माझी खात्री आहे हा माझा भास नव्हता. जे काही झालं ते खरं होतं.
पण जर खरं होतं तर आता असं का? आणि विनायक कुठे आहे? कुठं बाहेर गेलाय की काय? गेला असेल तर मला सांगून का नाही गेला? की सांगून गेलाय आणि मला आठवत नाही? नक्कीच तो भास नव्हता, की होता? की हाच माझा भास आहे? काहीच समजतं नाही. खूप थकवा वाटतोय, पडूया जरा.
सुजाता शांत डोळे मिटून पडून राहिली. पण डोक्यातील विचार काही जाईनात.
'विनायक बाहेर नाही जाणार असा. मागच्याच आठवड्यात त्याची तब्येत किती बिघडली होती.
अचानक ताप किती वाढला रात्री, आणि कसा तो त्याचा श्वास अडकला. कस त्याने सहन केला इतका त्रास देव जाणे. परमेश्वरा, त्याचे सगळे आजार, त्रास, वेदना मला दे रे.’
तिने तशातच देवाला हात जोडले.
'रात्री जेवेपर्यंत ठीक होता. नीट जेवलाही होता त्या दिवशी. त्याची आवडती मेथीची भाजी केली होती. किती दिवसांनी काही खावंसं वाटतं म्हणाला होता. त्याचा आवडता चहाही झाला जेवणानंतर.
झोपलाही शांत होता, पण अचानक काय झालं नी झोपेत श्वास घ्यायला त्रास पडू लागला. वेळीच मला जाग आली म्हणून बरं.
अंग तर चटका बसावा इतकं तापलं होतं.
त्यात त्याचा ‘सुजाता, सुजाता’ आक्रोश. काय करावं सुचेना. हात पाय गळून गेले विनायकची अवस्था बघून. अंगातील ताकतच नाहीशी झाली, घामाने डबडबले मी. श्वास पण लागत होता.
तरी नशीब डॉक्टरांना लगेच फोन लागला. माझी तर बोबडीच वळली होती. काय बोलावं सुचेना. एकदम भिरभिरायला लागलं मला, डोळ्यासमोर अंधारी आली.
डॉक्टर काय ते समजले, लगेच येतो म्हणाले. पण मग पुढे……. काय झालं पुढे……’
----------------
दिवेलागणीची वेळ झालेली. लॅच उघडून विनायक घरात आला. खूप दमलेला, डोळे अधिकच खोल गेलेले, त्या खालील काळी वर्तूळं जास्तच गडद झाली होती.
लाईट्स, पंखा लावून तो आरामखुर्चीवर टेकला. समोर टेबल वर उघडलेला पेपर पाहून तो अवाक झाला.
'सकाळी निघे पर्यंत तर पेपर आला नव्हता, आणि तो इथे.’ तसाच त्याने तो हातात घेतला.
त्याच पानावर एका सदराखाली सुजाताचा फोटो होता.
सदराचं नांव होतं "सहवेदना"!
तेवढ्यात फोन वाजला. विनायक खुर्चीवरून सावकाश उठला आणि फोन घेतला.
- "हॅलो"
- "हां, बोला डॉक्टर"
- "हो आताच आलो. सकाळी लवकर निघालो होतो." बोलताना विनायकला धाप लागली.
- "हो, तब्येत ठीक आहे."
- "तेव्हडंच तर करु शकत होतो मी सुजातासाठी आता. पुर्वी फार इच्छा होती तिची पंचवटीला जायची, पण… राहून गेलं. निदान तिच्या अस्थितरी…" विनायकला गहिवरून आलं.
- "हो. घेतो काळजी."
- "त्या रात्री तुम्ही वेळेत आला नसता तर… माझी अवस्था पासून सुजाताला दम्याचा अटॅक आला, तशातच तिने तुम्हाला फोन…"
- "मला मागे सोडून स्वतः पूढे निघून गेली."
- "सावरतोय. पण असं वाटतं की ती आहे… इथेच…" विनायकने घरात एक नजर फिरवली.
- "हो. घेतो काळजी."
- "येतो. ठीक आहे. ठेवतो."
फोन ठेवून विनायक आरामखुर्चीत बसला.
त्याचे डोळे भरून आले.
'सुजाता असती तर…. तर नक्की विचारलं असतं – अहो चहा घेताय ना?’
-- समाप्त --