पाऊस
पाऊस म्हणजे पाऊस
तुमच्या-आमच्या
जगण्यातली हौस
पाऊस वळवाचा
मारकुटा दादला
पाऊस आषाढाचा
नवरा वेल्हाळ भिजला
पाऊस श्रावणातला
खट्याळ मोहन
पाऊस विरहीणीच्या
नयनी दडलेला साजन
पाऊस रंगेल-रांगडा
आज इथे तर उद्या तिथे
करतो भांगडा
पाऊस चिंब चिंब
मनातली गाणी
पाऊस कुणब्याच्या
डोळ्यातलं पाणी
पाऊस धरणीच्या
लोचणीचा खुमार
पाऊस निसर्गलेण्याचा
संसार
पाऊस चातकाचं सपान
पाऊस हिर्वाईचा सोपान....
पाऊस म्हणजे पाऊस
तुमच्या-आमच्या
जगण्यातली हौस...!!
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु.जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.