गझल
वृत्त: लज्जिता
लगावली: गालगागा/लगालगा/गागा
****************************************
दे भले जिंदगी भिकाऱ्याची!
पण, नको जिंदगी जुगाऱ्याची!!
फूल रानातले लळा लावे.....
लागली ओढ रानवाऱ्याची!
काय मृत्यू उसंतही देतो?
बांधण्या वळकटी पसाऱ्याची!
विस्तवाचे जिणे मिळालेले....
काय भीती मला निखाऱ्याची?
भय कधी वाटले न लाटांचे!
मात्र धास्ती मला किनाऱ्याची!!
ठेवली चढवुनीच प्रत्यंचा!
वाट बघतो तुझ्या इशाऱ्याची!!
वंश माझा मुळात वाऱ्याचा!
काळजी ना मला निवाऱ्याची!!
आंधळे प्रेम मी किती केले?
साक्ष तू काढ शुक्रताऱ्याची!
काय साधासुधा, किती भोळा!
काळजी वाटते बिचाऱ्याची!!
चोच मजला दिली अरे, ज्याने;
सोयही तो करेल चाऱ्याची!
काय शेतामधे अरे, पिकले?
फक्त चिंताच शेतसाऱ्याची!
क्षीण माझी जरा मला म्हणते....
दुर्दशा जाहली खटाऱ्याची!
वाजवू लागले लोक मजला....
आज माझी दशा नगाऱ्याची!
पावसाचा न थेंबही कोठे!
तोच लीला सुरू पिसाऱ्याची!!
जन्मतानाच मी, असे वाटे.....
वेळ झाली जणू घसाऱ्याची!
भेटतानाच त्यास, मज कळले....
भेट झाली जणू शिकाऱ्याची!
चालणे थांबले न कोठेही!
वाट मी पाहिली न थाऱ्याची!!
राख माझीच चाळुनी जगलो....
जात माझी असेल झाऱ्याची!
जाब जनता विचारते तेव्हा....
बोलती बंद का पुढाऱ्याची?
रद्द झाला लिलाव तो अंती!
मालमत्ता पडीक पाऱ्याची!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१