भोगही उपभोगले मी दिलखुशीने!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
**************************************************

भोगही उपभोगले मी दिलखुशीने!
दु:खही कवटाळले मी दिलखुशीने!!

व्रत जिण्याचे घेउनी जन्मास आलो.....
मोह सारे टाळले मी दिलखुशीने!

माहिती होते मला वैकल्य माझे;
त्यासही स्वीकारले मी दिलखुशीने!

तीक्ष्ण होती धार शब्दांना सुऱ्याची.....
वार ज्यांचे झेलले मी दिलखुशीने!

स्वप्न अन् ते सत्य या रेषा समांतर!
हे समीकृत सोसले मी दिलखुशीने!!

शब्द स्वप्नांना दिला मी सोबतीचा.....
शब्द माझे पाळले मी दिलखुशीने!

सल नकारांचे तुझ्या, चिन्हे स्मृतींची;
अंतरी सांभाळले मी दिलखुशीने!

गरज माझी पायथ्याला जास्त होती;
शिखरही नाकारले मी दिलखुशीने!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१