ओ - म - न - मो - भ - ग - व - ते - व - सु - दे - वा - य
ओठात नाम ओढ भगवंताची
मनात भाव मग्न बोटं साधकाची
नटली मूर्ती शामल नयनांच्या कोंदणात
मोती व माणिक लाल मोरपंख मुकुटात
भरजरी वस्त्रभूषणे भद्रासनी विराजित
गजरे फुले सुवासिक गळ्यात घाली भाविक
वदनावरी विलसे वत्सलता परमानंद
तेजः पुंज मुख पाहिले तेधवा सुख बहु झाले
वाजविता टाळ-टाळ्या वाजंत्री ही साथ द्याया
सुदर्शनधारीची स्वारी सुपर्णावरी पाहा या
देऊळी-राऊळी नको जाया देही शोधला राया या
वाचे तुकोबाची गाथा वाचे बोले ज्ञानोबा माऊली
'यज्ञ जपाचा' लागे हाता यक्षधन हेची, हेची साऊली
विजया केळकर __