लग्नापूर्वीची मैत्रीण

"आज तर तुम्ही खूप खूश दिसताय"
"हा. बऱ्याच वर्षांनी मित्रांची भेट होणार आहे न"
"मित्रांची की मैत्रिणीची? "
"तेच ते.... "
"अच्छा, म्हणजे कोणी स्पेशल होती वाटते"
"हा हा हा ... मला वाटून काय उपयोग होता, तिच्याकडून काहीच सिग्नल नव्हता. आणि एकाच पोरीवर मरणारे बरेच होते. "
"का? बाकीच्या मुली नव्हत्या का? "
"मेकॅनिकलला कसल्या आल्याय मुली... जाऊ दे, चल आता लौकर"
************
"मी माने, शरद माने"
"हाय, मी संगीता चौधरी, अनिकेतची बायको, ते तिथे, ब्ल्यू शर्ट"
"अच्छा, आणि त्यांच्या   शेजारी जी आहे ती माझी बायको, स्नेहल"
"हो का... हे सगळे मजेत आहेत अन मला बोअर होतंय"
"मला पण... "
*********
"मिसेस चौधरी... "
"अरे तुम्ही? इथे? "
"हा... इकडे एका क्लायंटकडे आलो होतो, पण तुम्ही? "
"मी नक्षत्रला जात आहे"
"बापरे, हिरे घेणार की काय? "
"नाही हो, नक्षत्र मॉलला जातेय"
"अरे वा, चला की मी सोडतो तुम्हाला. मी पण तिकडेच चाललोय"
"मी. माने, कशाला उगाच तुम्हाला त्रास. मी जाईन की बसने"
"त्रास कसला हो. मार्केटिंग म्हटलं की फिरणं आलंच, अन कंपनीची गाडी आहे, खिशातून थोडीच जाणार आहेत पैसे"
"बरं"
****************
"आज माने भेटले होते"
"कोण माने"
"तुमच्या स्नेहलचे मिस्टर"
"माझी स्नेहल? तुला म्हणायचंय काय? "
"तुमची मैत्रीण ना ती"
"हो पण मी तिच्यासोबत फिरत नाही मॉलमध्ये वगैरे"
"हो, तुम्हाला त्याची गरजही नाही ना आता? एकाच ऑफिसमध्ये असता, कशाला फिरावं लागेल? "
"हे बघ संगीता, तू उगाच... "
"मला माहिती आहे, तुमचं तिच्यावर प्रेम होतं ते"
"तो भूतकाळ झाला"
"हो पण ते भूत जिवंत व्हायला वेळ नाही लागणार"
"आणि तू मानेसोबत फिरते ते.... त्याचं तुला काहीच वाटत नाही. "
"मी काही वाईट केलेलं नाही, म्हणून स्पष्टपणे बोलू तरी शकते"
"मी सुद्धा काहीही केलेलं नाही "
"करून तर बघा, मग मी आहे अन .... "
"........... "

***************

"लागला का काही पत्ता.. "
"नाही"
"कुठे गेली असेल रे? तुमचं काही भांडण झालं होत का? सॉरी पण ... "
" माझ्यावर ती उगाच संशय घेत होती बरेच दिवस"
"कशाबद्दल? "
"हेच ... तुझं अन माझं काहीतरी अफेअर... "
"अनिकेत ! आपण आता कॉलेजमेट नाही"
"हे मला कळतं पण तिला नाही"
"म्हणजे ती घरातून निघून गेली याचं कारण मी आहे? "
"नाही नाही... तिचा संशयी स्वभाव... "
"आणि, तुझ्या हातात काय आहे ते? "
"घटस्फोटाची नोटिस. "
"काय? अरे पण .... "
"तिचा स्वभावच काही दिवसांपासून असा झालाय. आपण मागच्या वर्षी गेटटुगेदरला भेटलो तेव्हापासून.... अन मग माझ्या कंपनीत तू जॉबला लागलीस, तेव्हापासून तर .... "
"अनिकेत, सावर स्वतःला... "
"तुला सोपं वाटतं गं.. पण ... '
"सोपं... हम्म ... "
"तुझा नवरा खूप चांगला आहे"
"असं तुला वाटतं"
"म्हणजे? "
"तोही असाच झालाय इतक्यात.... म्हणजे ६-८ महिन्यांपासून... "
"......... "
"सतत बाहेरचे दौरे... अन आला की खावखाव... "
"आता कुठे आहे? "
"असेल नागपूर नाहीतर यवतमाळला"
"यवतमाळला? "
"हो का? "
"यवतमाळला कशाला? कंपनीचं काम? "
"नाही. तिथे मित्रांसोबत पार्टी आहे म्हणे"
"पण तो तर नगरचा आहे ना? यवतमाळचे मित्र? "
"हो, या महाशयांनी बी. एड. केलंय तिथून... वर्षभर होता तिथे... "
"बी एड? पण तो मार्केटिंग.... "
"ती लांबलचक स्टोरी आहे... जाऊ दे, तू कोणत्या दुःखात अन मी काय सांगतेय... "
"वेट.... तो बीएडला कोणत्या वर्षी होता? "
"अरे जाऊ दे ना त्याचं बीएड... तू काय घेऊन बसलाहेस... आधी संगीताला शोधायचं कसं त्याचा विचार कर. तिच्या घरी फोन केलास? "
"हो. ती तिथे नाही... पण मला सांग तुझ्या नवऱ्याने बीएड केव्हा केलं"
"अनिकेत, आर यू ओके? "
"हो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे"
"हं बघते त्याचा सिव्ही .........२००८-०९"
"तरीच... "
"तरीच काय? "
"त्याने इतक्यात त्याला संगीता बरेचदा भेटली हे सांगितलं होतं? "
"हा... एक दोनदा म्हणाला होता खरा ... पण ... "
"तुला कळलं का? संगीता आणि शरद एकाच वर्षी यवतमाळला बीएड करत होते.... "
"हो असेलही... पण कॉलेज एकच असेल कशावरून? "
"असणारच ... बघ त्याच्या सिव्हीमध्ये, गव्हर्मेंट कॉलेज असणार... "
"हो... म्हणजे.... "
"म्हणजे ते पार्टी करताय अन ...."