तुझ्या नभातील मेघ दारावरून गेले!

गझल
वृत्त: सती जलौघवेगा
लगावली: लगालगागा/लगालगागा/लगालगागा
******************************************

तुझ्या नभातील मेघ दारावरून गेले!
उजाड डोळे तुडुंब अगदी भरून गेले!!

तमाम आयुष्य पाहिली मी तुझीच स्वप्ने....
तुझ्या प्रतीक्षेत श्वास सारे सरून गेले!

तुझ्या कृपेचे तुषार जे दोन चार आले....
तमाम माझी हयात हिरवी करून गेले!

सुपातल्यांनी जरूर जात्याकडे पहावे!
सुपामधेही कुणी मला कुसकरून गेले!!

असा खिलाडू स्वभाव असणे....गुन्हा नव्हे हा!
मलाच ते खेळण्यापरी वापरून गेले!!

कुणास झालर, कुणा सजावट हवीच होती....
मलाच गरजेनुसार ते कातरून गेले!

करून झाली, करायची ती यथेच्छ मस्ती!
अखेर तारुण्यही तिचे ओसरून गेले!!

उरातले काढता न आले कधीच काटे!
अखेर ते शल्य पूर्ण मज पोखरून गेले!!

मलाच ते ओंडक्याप्रमाणे धरून होते!
मलाच बुडवून शेवटी ते तरून गेले!!

इतस्तत: मी पडून होतो....जसा पसारा!
कळे न वादळ कसे मला आवरून गेले!!

इथून जातात आज झुंडी दिशादिशांच्या!
अनेकजण प्राण या इथे अंथरून गेले!!

अखेरचा श्वास मुक्तता देउनीच गेला....
उभे जिणे हात वेदनेचा धरून गेले!

जगात वेडेच लोक इतके दहा दिशांना!
खरे शहाणेच वेड बघ पांघरून गेले!!

घरात एकांत फक्त, माझ्यासवे रहातो!
असे कसे वाटते कुणी वावरून गेले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१