चुरगाळल्या शब्दात कविता शोधतो

चुरगाळल्या शब्दात कविता शोधतो
टीपांत अन्‌ कंसात कविता शोधतो

अर्थास शैलीदार फाशी देउनी
शृंगारल्या प्रेतात कविता शोधतो

होते कुठे, जग चालले आहे कुठे
मी आपला परसात कविता शोधतो

येता गझल होऊन यौवन लाजरे
अरसिक पहा, ग्रंथात कविता शोधतो

धुंदी कमी, जितके अधिक फेसाळणे
मी घोटभर निर्वात कविता शोधतो

पुसतात ज्यांनी झोकली नाही कधी
"हा कोणत्या कैफात कविता शोधतो?"

संसार, पेशा, प्रकृतीचे तापत्रय
देऊन त्यांना मात कविता शोधतो

केव्हातरी गवसेल, थोडा वेळ दे
पसरून लिहिते हात कविता शोधतो

होता रिते साहित्य, रमणी अन्‌ चषक
निर्गुण निराकारात कविता शोधतो