वादळाला विचारून आलो!

गझल
वृत्त: भामिनी
लगावली: गालगा/गालगा/गालगा/गा
**************************************************

वादळाला विचारून आलो!
मी किनारे झुगारून आलो!!

काय हे फक्त पडसाद माझे?
मी कुणाला पुकारून आलो?

स्वप्न माझे, तुझे, या जगाचे....
चौदिशांना चितारून आलो!

हात जोडायचो नेहमी मी!
हात आता उगारून आलो!!

वाहवा अन् प्रसिद्धी नको ही...
मी शिखरही नकारून आलो!

वाट आहे फुलांचीच आता...
सर्व काटे निवारून आलो!

वाच माझी नवी प्रत निघाली...
बघ तरी, मी सुधारून आलो!

घमघमू लागला मंच सारा!
शेर माझे फवारून आलो!!

चाप बसला टवाळांस थोडा....
फक्त डोळे वटारून आलो!

काय त्यांनाच येते बढाई?
आज मीही फुशारून आलो!

फेर धरला तुझ्याही विजांनी!
मोर झालो, पिसारून आलो!!

ही नजर, ही खळी जीवघेणी...
त्या नशेने घुमारून आलो!

झोत आला तुझ्या आठवांचा;
धूळ होतो...भरारून आलो!

तू बरसलीस या माळरानी!
मी किती बघ तरारून आलो!!

तू धुके एक माझ्या मनाचे!
बघ किती मी दवारून आलो!!

सर तुझी काय येऊन गेली...
मी मनाने निखारून आलो!

फक्त मतलाच मी पेश केला!
मैफिलीभर शहारून आलो!!

भेद काट्याफुलांतील मिटला!
वृक्ष झालो...फुलारून आलो!!              

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१