मोकळ्या हवेमधे फिरू!

गझल
वृत्त: कामिनी
लगावली: गालगाल/गालगाल/गा
***********************************************

मोकळ्या हवेमधे फिरू!
ये, मनास मोकळे करू!!

पायमोड खूप जाहली...
पाय मोकळे जरा करू!

रोज यायची न पौर्णिमा;
आज चांदणेच पांघरू!

द्यायला तिला फुले बरी!
मात्र काळजास अंथरू!!

चोरुनीच हिंडलो इथे!
आज राजरोस वावरू!!

आठवेल शब्द शब्द तो....
स्पर्श काय बोलले स्मरू!

ही हवा तिच्याच गावची....
भोवती तिच्याच भिरभिरू!

श्वास लागलेत हे सरू....
स्वैर या मनास आवरू!

अंतरात कोण गुणगुणे?
शेर लागलेत पाझरू!

पंख का उधार घ्यायचे?
पांगळेच पाय वापरू!

ये, पुन्हा अनोळखी बनू!
अन् नवीन ओळखी करू!!

प्रेम निर्विवाद आपले!
वाद अन् विवाद विस्मरू!!

वादग्रस्त वादळी जिणे....
आज निर्विवाद ते करू!

तू पुन्हा दुखावलीस का?
लागलो फिरून मी झरू!

शल्य ठेवुनी उरामधे;
डाग लागलेच ओसरू!

दाटल्या मनामधे स्मृती!
कलकलाट जाहला सुरू!!

गाय हंबरे अजूनही!
ना दिसे कुठेच वासरू!!

भंगताच स्वप्न....हे करू!
काळजामधेच ते पुरू!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१