सांग काळीज का कोणते कापले?

गझल
वृत्त: स्रग्विणी
लगावली: गालगा/गालगा/गालगा/गालगा
************************************************

सांग काळीज का कोणते कापले?
आज जो तो बघे आपले आपले!

पानगळ सोसताना कळाले मला....
कोण परके असे, कोण अन् आपले!

मी कुठे अन् कधी एकटा राहतो?
सर्व एकांत माझे तिने व्यापले!

मी चुकीचे असे काय रे बोललो?
काय, माझ्यामुळे लोक संतापले?

भाज पोळी तुझी, वेळ ही चांगली!
दु:खितांचे तवे केवढे तापले!!

या सुखासीन लोकांस कळणार का?
वेदनांच्या उन्हाने कुणी रापले!

ते गुन्हेगार झाले फरारी पहा...
नाव माझेच त्यांनी कसे छापले?

घर न बांधून झाले हयातीमधे!
या ठिकाणीच थडगे अता स्थापले!!

दु:ख डोकावते....काळजी घेतली....
चेहऱ्यावर स्मितांचेच थर थापले!

सांग उ:शाप कोणास मागू तरी?
हे कुठे ज्ञात कोणी मला शापले!

सांग केली कुठे गय मढ्यांची तरी?
हेच ते लोक ज्यांनी मला चापले!

त्या टवाळांपुढे हात मी टेकले!
सभ्य भाषेमधे त्यांस मी झापले!!

ठेवतो अन् विसरतो कुठे ठेवले!
वेंधळा, वर म्हणे ते कुणी ढापले?

पार मेल्यावरी जाग आली जगा!
शायरी तोलली अन् मला मापले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१