अबोलाही तिचा बोलून गेला!

गझल
वृत्त: मृगाक्षी
लगावली: लगागागा/लगागागा/लगागा
**************************************************

अबोलाही तिचा बोलून गेला!
मला काही तरी सुचवून गेला!!

कसा मी वेंधळा इतका कळेना;
मला जो तो पहा हटकून गेला!

जरासे दार झाले किलकिलेसे....
नको तो आत डोकावून गेला!

जणू मी झाड जे रस्त्यामधोमध!
मला रस्ता स्वत: छाटून गेला!!

न पासंगासही माझ्या पुरा तो....
तरी टेंभा किती मिरवून गेला!

फळांनी मी लगडलो....चूक झाली!
दगड जो तो मला मारून गेला!!

फुले तोडून गेला....दु:ख नाही!
पहा काटेच तो पसरून गेला!!

पहा लोंढाच आला सांत्वनांचा....
जखम प्रत्येक अन् भिजवून गेला!

निसटला भोवऱ्यामधुनी जरी तो;
किनारा शेवटी बुडवून गेला!

दऱ्या बाजूस दोन्ही, बिकट रस्ता....
सुरक्षित जो मला घेऊन गेला!

विचारांचा जथा आला अचानक!
मनाला पार भंडावून गेला!!

न इतके दु:ख ग्रीष्माच्या झळांचे!
मला पाऊस वेडावून गेला!!

मतांची भीक मागायास आला...
हरेकालाच गोंजारून गेला!

खिरापत वाटुनी आश्वासनांची;
गरीबांनाच तो चकवून गेला!

किती पेरून साखर बोलला तो!
शिताफीने किती फसवून गेला!!

अशी बरसात शेरांचीच केली!
सभेला चिंब तो भिजवून गेला!!

न केले काय गझलेस्तव तयाने?
उभे आयुष्य तो उधळून गेला!

गझलसम्राट ना झाला उगा तो!
गझल जगला, गझल पेरून गेला!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१