मंतरलेले दिवस

आठवता तू  आठवते मज तुझे साजिरे रूप मनोहर
आणि आठवे नदीकाठचे तुझे अनुपम अधीर अंतर
गीताच्या तालावर फिरती चाफेकळी बोटे चाकावर
आणि आठवे हुप्प चेहरा मनावेगळेसे झाल्यावर
कसे सांगू आणिक आठवे अश्रू झेलते तुझेच रे कर
समजुतीचे शब्द ऐकता गलबलून ते जाई अंतर
काय बोलले कधी भेटले नजरेपुढती होई सादर
कशी विसरू या आठवणी अन कशी राहू रे तुजपासून दूर
आला दिवस जाई निघोनी वात पाहे भिरभिरती नजर
मंतरलेल्या त्या दिवसांची कधी न येईल कशासही सर