" आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी - "

आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी
हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी ..

भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद
विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद ..

तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार
पेलतो विठ्ठल आमचा हा संसार ..

भक्त सारे गुंग मुखात अभंग
भजनात रंग कीर्तनात दंग ..

जातीभेदा वारीत नाही हो थारा
विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा ..

उच्चनीच नाही, नाही रावरंक
सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक ..

"विठ्ठल विठ्ठल"- गर्जता शिस्तीत
दिंडीला येई जोर, वाडीवस्तीत ..

बाल-वृद्ध चालता चालता वारीत
विठ्ठलाचा जयघोष मुखाने करीत ..

रिंगणात नाचूया, विठ्ठल विठ्ठल
या रे सारे गाऊ, विठ्ठल विठ्ठल ..

"जय हारी विठ्ठल"- दिंडी म्हणतसे
तहानभूक विसरून, धुंदी आणतसे ..

जीवनी घडावा वारीचा प्रसंग
जन्मोजन्मी राहील विठ्ठलाचा संग !
.