बोलून गेलो नेमके, टाळायला जे पाहिजे!

गझल
वृत्त: मंदाकिनी
लगावली: गागालगा/गागालगा/गागालगा/गागालगा
************************************************

बोलून गेलो नेमके, टाळायला जे पाहिजे!
मी बोललो नाही कधी, बोलायला जे पाहिजे!!

माझे मला कळते कुठे? होते कसे हे नेहमी?
मी का उगारे हात हे? जोडायला जे पाहिजे!

पुसली जगाची लोचने, केली मलमपट्टी किती!
ना सांधले माझे चरे, सांधायला जे पाहिजे!!

गुंतेच बसलो सोडवत, गुंत्यात गुंतत राहिलो!
नाही उमजले जन्मभर, निसटायला जे पाहिजे!!

मोहांचिया पाशातुनी निसटायला मी झुंजलो!
मी ओरबाडू लागलो, निखळायला जे पाहिजे!!

ते सावकारासारखे मजला तगदा लावते!
ते स्वप्न मी पुरले उगा, जाळायला जे पाहिजे!!

वाचून नुसती पुस्तके, मी पढतपंडित जाहलो!
ना चेहरे मी वाचले, वाचायला जे पाहिजे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१