प्रपोजल- एक नाटक

ह्या नाटकाला २८ पारितोषिके मिळाली आहेत आणि टीकाकारांनी उचलून धरले आहे, अशी बरीच ख्याती कानावर आली होती. त्यामुळे हे नाटक बघायचे असे मनाशी ठरवले होते. त्याप्रमाणे, एकदाचा, एका रविवारी मुहूर्त मिळाला. तिकीटे काढल्यावर लक्षांत आले की डॉ. अमोल कोल्हे, आता काम करत नसून त्यांच्या जागी कोणी 'आस्ताद काळे' काम करतात. पण अदिती सारंगधर आहे, हे पाहून बरे वाटले.

नाटक चालू होण्यापूर्वी, नेहमीची मोबाईल बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली पण त्याच बरोबर, लहान मुलांनी किरकिर करु नये म्हणून त्यांनाही 'बंद' करण्याची सूचना गंभीरपणे देण्यात आली. यावर काही प्रेक्षक फिदीफिदी हंसले. आम्हाला मात्र हंसु आले नाही.

पडदा उघडताच स्टेजवर चक्क, मरेची लोकल ट्रेन उभी असलेली दिसली. मुळ्येंच्या नेपथ्याचे, आम्ही मनांतल्या मनांत कौतुक केले. काही प्रेक्षकांनी त्या दृष्याला टाळ्या वाजवल्या. ट्रेन चालू होतानाच (म्हणजे मागील पाट्या डावीकडून उजवीकडे हलायला लागल्यावर, आस्ताद काळेने(आका) ट्रेन पकडली. शेवटची होती ना ती! त्याच्या पाठोपाठ अदिती आली धांवत धांवत! तिला चालत्या ट्रेनमधे, आकाने हात दिल्यामुळे चढता आले. ती सावरते आहे तोच, तो तिच्यावर, "पडला असता म्हणजे", असे वसकन ओरडला. तिचे थँकू थँकू आणि त्याचे लाऊड बोलणे ऐकल्यावर आणि त्या दोघांचा बिनधास्त अभिनय सुरु झाल्यावर, आता आपल्याला एखादे एक्स्टेंडेड 'फू बाई फू' तर बघावे लागणार नाही ना, अशी अशुभ शंका मनाला चाटून गेली. प्रत्यक्षांत, उत्तरोत्तर, त्याहूनही भडक अभिनय आणि भडक कथेशी गांठ पडली.

त्यांच्या बोलण्यावरुन तो एक अविवाहित साधाभोळा तरुण आणि ती एक कॉलगर्ल, एवढे कळले. त्यानंतरचे त्यांचे डायलॉग म्हणजे, गंभीर विषयाच्या डोहावर पीजेंच्या भाकर्‍या उडवणे आणि सुमार प्रेक्षकांचे अस्थानी हंशे वसुल करणे, याप्रकारचे वाटले. 'बसणार का?' या तिच्या बोल्ड प्रश्नाला, 'बसलोच आहे की आत्ता' असे भोट उत्तर देणे, किंवा तिने सिगरेट ऑफर करताना,'ओढल्यावर लहान होणारी ही एकच वस्तु आहे', अशी कॉमेंट करणे असल्या प्रकारचे अगणित विनोद सतत आमच्यावर फेकण्यात आले. थोडक्यांत ती दोन पात्रे,'स्ट्रीटस्मार्ट' हे पटवून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

पहिल्या अंकात प्रेक्षकांना कायकाय दिसते ? तिने केलेली छेडछाड आणि त्याचे अवघडून बसणे वा लाजणे.पाणी,दारु,खाणे आणि शरीर या जीवनावश्यक गोष्टींची, तिने वारंवार केलेली ऑफर ! तसेच तिची फिल्मी कर्मकहाणीही समजते.एकमेकांच्या नांवाची ओळख करुन घेताना त्याचे नांव,निवृत्ती आहे,हे कळल्यावर त्या राधाचे विकट हास्य पाहून, निवृत्तीच काय,पण प्रेक्षकही गर्भगळित होतात.मधेमधे,झोपेतून उठवले नाही म्हणून शिवीगाळ करुन उतरणारा प्रवासी,'रूळ टूट्या',म्हणून खेकसणारा रेल्वेचा कर्मचारी, वेडा बनून आलेला आणि आकाची बॅग पळवण्याचा प्रयत्न करणारा आणि अंकाच्या शेवटी,चाकू दाखवून,अदितीला लुटण्याचा प्रयत्न करणारा भुरटा अशा विविध सोंगात राजन ताम्हाणे(राता)दिसत रहातात.आणि सगळ्या रोलमधे,ते राजन ताम्हाणेच वाटतात..

पहिल्या अंकाच्या शेवटी,अदिती आणि राता,यांच्यात झालेल्या झटापटीत अचानक राता मरतो आणि तो खून आहे असे स्वतःच ठरवून निवृत्ती तिला जेलात पाठवतो,कारण तो पोलिस असतो.

अवांतरः- पहिला अंक संपल्यावर आमचे एकमत झाले की शिवाजी मंदिरचा बटाटावडा फारच चांगला होता. सध्या फक्त वड्याबद्दल मत आणि दुसरा अंक संपल्यावरच नाटकाबद्दल चर्चा करायची असे ठरले.
दुसर्‍या अंकाआधी, सर्व नाट्यशिबिराकांक्षी मुलांसाठी एक विशेष सूचना देण्यात आली. त्यानुसार, त्यांनी नाटक संपल्यावर स्टेजवर जमायचे होते.

दुसर्‍या अंकात तोच रेल्वेडब्याचा सीन! पण आता 'राधा' कोठीवाली बाई' झालेली असते. तिचा दलाल फर्स्टक्लासच्या डब्यात तिच्यासोबत असतो. त्यांचा हिसाब पूर्ण झाल्यावर तो उतरुन जातो. याठिकाणीही तो 'राता' आहे हे कळायला, क्षणाचाही अवधी लागत नाही. मग राधाला शोधत आका येतो. त्याची आता बढती झालेली असते. तो राधाला डायरेक्ट मागणी(म्हंजे प्रपोजल) घालतो. ती रागावते, तुरुंगात पाठवल्याबद्दल त्याची निर्भत्सना करते. पण गडी पेटलेलाच असतो. तो त्याची(पण) दर्दभरी कहाणी सुनावतो. त्यांत तो ही अशाच आईच्या पोटी जलमाला आलेला असतो. भावनाविवश होऊन तो,भान विसरुन गाडीतून खाली उतरुन अभिनय करायला लागतो. (तोपर्यंत गाडी सुटेल या कल्पनेने आम्ही अस्वस्थ झालेले असतो.) त्याचा हा बाण वर्मी लागतो. राधाला हर्षवायु होतो. ती होकार देते आणि त्या आवेगात गाडीतून खाली पडते.तो बेभान होऊन ओरडू लागतो,स्वतःच्या गुरुजींना बोल लावतो. या गुरुजींना 'भावे' नांवाचे लेबल का लावले ते समजले नाही. नाटक संपते.
या ठिकाणी,एखादा इन्स्पेक्टर येऊन सब-इन्स्पेक्टर निवृत्तीला,राधाला मारण्याच्या किंवा आत्महत्येला उद्युक्त करण्याच्या आरोपाखाली जेलात पाठवतो, असा शेवट केला असता तर तो पहिल्या अंकाच्या शेवटाला मॅचिंग ठरला असता अशी मनांत एक कल्पना चमकून गेली. शिवाय त्यामुळे,राता ला आणखी एक रोल करण्याची संधीही मिळाली असती. असो.

अति अवांतरः नाटक संपल्यावर आम्ही, दुखर्‍या गुडघ्यांनी बाहेरची वाट धरली तोच, प्रेक्षागृहातच बसलेली १०-१२ वर्षांची अनेक मुले स्टेजकडे पळाली. अरेरे, त्यांना या वयांत शिबिरांत जाण्यासाठी काय काय पहावे लागले ?
आम्ही सारे, छबिलदासी चळवळीचे पूर्वापार प्रेक्षक असल्याने, हतबुद्ध होऊन, कुठलीही चर्चा वा मत व्यक्त न करता, घरची वाट धरली.