धरणी सजनी
काळी धरणी सजनी
हिर्व्या शालूनं नटली
कणसं मोती-पोवळं
तिच्या गळ्यात साजली
सूर्व्या साजन सोनेरी
घाली किरणांची सरी
दवबिंदूंच्या खडीला
देई कोंदण सोनेरी
वारा होउनी भालदार
झुळ झुळ ताल धरी
पानं मखमली डुले
जणू ढाळीते चवरी
वरुण तो चोपदार
छत्र ढगांचे धरीतो
रिमझीम बरसुनी
धुंद अत्तर शिंपीतो
नभांगण रंगवितो
सप्तरंगांचा रंगारी
हर्ष-उल्हास श्रावणी
देव नांदती शिवारी
-उद्धव कराड, (मो. नं. ९८५०६८३०४५)
मु. जळगांव, ता. निफाड, जि. नाशिक.