आषाढ आर्त ..

आषाढ आर्त ...

आषाढ वरुण ।
कृपेने भरून ।
जातसे सरून ।
देह भाव ॥
आषाढ मासात ।
अभंग ओठात ।
भावही मनात ।
वाहे कैसा ॥ 
सावळा विठ्ठल ।
केव्हा तो भेटेल ।
अंतरी विव्हल ।
वारकरी ॥
ज्ञानोबा तुकोबा ।
भेटवा विठोबा ।
पालखीची शोभा ।
दिव्य पाही ॥
अभंगात गावा ।
मनात वसावा ।
एकचि विसावा ।
पांडुरंग ॥
आता नको काही ।
मागणे ते पायी ।
हे चि दान देई । 
विठा माई ॥