जे घडू पाहते...घडू द्यावे!

गझल
वृत्त: लज्जिता
लगावली: गालगागा/लगालगा/गागा
************************************************

जे घडू पाहते...घडू द्यावे!
वेदनांना मुक्या रडू द्यावे!!

आसवांनो नका असे बरसू....
शव जळे, त्यास भडभडू द्यावे!

ओरबाडून का व्यसन सुटते?
पान गळते तसे झडू द्यावे!

जिंदगीनेच जाळले त्याला....
जिंदगीलाच सावडू द्यावे!

दुर्गुणांचे खडे स्वत: निवडा!
सद्गुणांनाच पाखडू द्यावे!

काढता पाय घे मनाने तू...
मोहमायेस आखडू द्यावे!

नड खरी, त्यास देव देतोही!
मात्र म्हणतो प्रथम नडू द्यावे!!

जो शिकू पाहतो तया शिकवा!
मात्र त्याला जरा अडू द्यावे!!

कर तुझे कर्म तू निगूतीने....
बोलणाऱ्यांस बडबडू द्यावे!

तोंडपूजेपणा कुणी करती!
त्यांस औषध जरा कडू द्यावे!!

ज्यास वारस नसे, कुणी वाली;
काय प्रेतास त्या सडू द्यावे?

ऊब झाली महाग इतकी?
की, गरीबांस काकडू द्यावे!

ओढग्रस्ती बरी नव्हे इतकी....
आतडे काय तडतडू द्यावे?

उंदरांसारखे समीक्षक हे....
त्यांस मनसोक्त कुरतडू द्यावे!

काय पडतो फरक तुला त्याने?
त्या टवाळांस तडफडू द्यावे!

रांगडे लोक, रांगडी भाषा...
त्यांस शिवराळ बडबडू द्यावे!

काय मगरूर ते, मुजोरी ती...
वाटते त्यांस तडमडू द्यावे!

झाकले कान, घालुनी बोळे....
त्या टवाळांस ओरडू द्यावे!

फार दंगा न ज्या स्मृती करती;
त्यांस हृदयामधे पडू द्यावे!

कैक टेकू दिले किती वेळा...
जून वास्तूस पडझडू द्यावे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१