थांबलो येथे परी हा अंत नाही

थांबलो येथे परी हा अंत नाही
धावलो नाही, तरीही खंत नाही
ही नव्हे मंजूर सीमा मांडलेली
मी अजूनी बांधलेली भिंत नाही
पांथिका माझ्या किनारी ना विसावा
लाटही अद्याप येथे शांत नाही
नित्य येऊ दे चिता येथे स्मशानी
लाकडांना कोणताही पंथ नाही
हे रुढीच्या पालकांनो, चालते व्हा
त्रास सारे भोगण्या मी संत नाही
तू तुझी नाती नको सांधू नव्याने
मी कधीही मांडला आकांत नाही
- रोहित कुलकर्णी