लागली येऊ शिसारी सांत्वनांची!

गझल
वृत्त: मंजुघोषा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा
*************************************************

लागली येऊ शिसारी सांत्वनांची!
और आहे ही तऱ्हा मारेकऱ्यांची!!

काय माझी शायरी पाल्हाळ आहे?
का अशी दमछाक होते वाचकांची?

भट जसे गेले, कुणी उरले न वाली....
नोंदही घेई न कोणी शायरांची!

जन्मभर केली टवाळी फक्त त्यांची....
आज जो तो चघळतो कविता भटांची!

दाखवायालाच तो कैवार होता......
काळजी होती खरी त्यांना मतांची!

काय जंगलतोड केली माणसांनी......
वाढली शहरात येजा श्वापदांची!

ऊन्ह परवडले, स्वभावाने सरळ ते!
वाटते भीती तरूंच्या सावल्यांची!!

शायरीचे एक तो घनदाट जंगल!
त्यास भीती ना समीक्षक श्वापदांची!!

माणसाचा –हास आता दूर नाही!
माणसे  करतातत कत्तल माणसांची!

ऐन वेळेला नको धांदल उडाया....
सोय मी केली चितेच्या लाकडांची!

पोचल्या निम्म्याअधिक गौऱ्या स्मशानी....
आवराआवर करू दे भावनांची!

लागला वाढू जसा आजार माझा....
वाढली वर्दळ घरी, बघ सोयऱ्यांची!

    हात देणारा न होता  एक सुद्धा;
भोवताली माझिया गर्दी बघ्यांची!

पूर ओसरता नदी शुद्धीत आली!
पाहते दैना तटावरल्या घरांची!!

घे तुला माळायला काळीज माझे....
हे नव्हे काळीज, ही परडी फुलांची!

दार माझ्याही नशीबाचे उघडले!
घेतली मोजून किंमत आसवांची!!

भेट माझी अन्  तुझी ती दो घडीची....
जन्मभर मज याद येते त्या क्षणांची!

घालती माझ्या वहाणा आज मुलगे!
काळजी करतो तरीही मी मुलांची!!
                
.........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१