आचार्य विनोबा - विचार पोथीच्या निमित्ताने ...

आचार्य विनोबा - विचार पोथीच्या निमित्ताने ....

आचार्य विनोबांच्या साहित्याची ओळख झाली साधारणतः १९८१ च्या सुमारास.    त्याआधी आम्ही सगळे मित्र त्यांची टवाळकीच करायचो. पण एका मित्राला "गीता प्रवचने"
पुस्तक मिळाले आणि त्याने पहिले स्फुल्लिंग पेटवले - अरे, कस्लं भारी पुस्तके
हे....

झालं - त्या एका पुस्तकानेच जी मोहिनी पडली विनोबा वाङ्मयाची ती
कायमचीच..
मग हळुहळु स्थितप्रज्ञ दर्शन, गीताई चिंतनिका, प्रेरक पत्रांश, विचार
पोथी, मधुकर, अष्टादशी या सगळ्या ग्रंथसंपदेनं काबीजच केलं अंतःकरण.

त्यांची पुस्तके वाचताना एकंदरीत विनोबा हे एक भारीच
रसायन आहे हे जाणवतं. मुळात ते कोकणस्थ (स्वतः ते मानत नसणारंच अस्लं काही...) -
त्यामुळे विचारात व मांडणीत कमालीचा नीटनेटकेपणा व ठामपणाही.
दुसरे असे की
प्रयोगशीलता व चिंतनशीलता या पायावरच त्यांचे संपूर्ण जीवन उभारलेले. शेतातले,
रसोईतले वा इतर कुठलेही काम असो - स्वतः ते करणार व त्यात चिंतनाने वेगवेगळे प्रयोग
करीत रहाणार.

परमेश्वराविषयी विनोबा अतिशय सश्रद्ध. 

 विनोबांच्या अशिक्षित आईने त्यांच्यावर जे बहुमोल
सुसंस्कार केले त्याचे नित्यस्मरण त्यांना असल्याचे जाणवते व विनोबांवर दुसरा मोठा
प्रभाव जाणवतो तो महात्माजींचा. 

शंकराचार्यापासून ते अगदी ज्ञानोबा-तुकोबांपर्यंत
सगळ्यांच्या वाङ्मयाचा गाढा अभ्यास विनोबांनी केलेला. तो अभ्यासही असा की त्यावर
स्वतःचे अतिशय लॉजिकल मत ते असे मांडणार की जे वाचताना शंकराचार्य असो वा ही
संतमंडळी - विनोबांच्या मतावर नक्कीच कौतुकाची मान डोलावत असतील.
हे कमी की काय
म्हणून भारतातल्या इतर अनेक संतांचे वाङ्मय विनोबांनी समरसून अभ्यासलेले;
याव्यतिरिक्त भारतातल्या व युरोपीय अनेक भाषा त्यांनी जाणून घेतलेल्या; अनेक
धर्मांचे विचार कसे मांडलेत याचाही सांगोपांग अभ्यास केलेला.

प्रखर पांडित्य असताना बुद्धी आणि तर्काच्या आहारी न जाता त्याच्या मर्यादाही
विनोबा कसे काय ओळखून आहेत हे मला तरी न उमगलेलं कोडंच आहे.
त्याजोडीला - १]
विवेकयुक्त प्रखर वैराग्य बाळगूनही सतत ईश्वरभाव धारण करु शकेल अशा कोमल अंतःकरणाचे
विनोबा.
२] उदंड कर्मे करुन त्यापासून पूर्णपणे अलिप्त असणारे विनोबा.
३]
अचंबित करणारा लोकसंग्रह असताना सतत अंतर्मुख असणारे विनोबा.
४] अतिशय विद्वान
असून बालकवत् निरागसता ज्यांच्याठायी आहे असे विनोबा.
५] सहजसोपे व आचरणीय
विचारधन वाटणारे विनोबा
अशा लोकविलक्षण गुणांनी संपन्न असणारे विनोबा हे एक केवळ
आश्चर्यच आहे.

विनोबांची उदंड ग्रंथसंपदा आहे. या सर्वांमधे मला
स्वतःला आवडणारी जी काही आहेत त्यापैकी "विचारपोथी" हे एक आहे. या पुस्तकाचे वर्णन
"वन लायनर" म्हणून करता येईल.
विचारपोथीत विनोबांची अभिव्यक्त (एक्सप्रेस)
व्हायची एक विशिष्ट शैली आहे. ही शैली म्हटले तर फटकेबाजी (पंचेस) यास्वरुपाची आहे
पण हे फटके केवळ वाचकाच्या/ विद्वानाच्या टाळ्या मिळवण्यासाठी अजिबात नाहीयेत हे
सुजाण वाचकाच्या लगेच लक्षात येते. तसेच स्वतःची विद्वत्ता वा कोटीबाजपणा दाखवायची
खुमखुमीही विनोबांच्याठिकाणी मुळीच नाहीये. 

हे विचार वाचताक्षणीच आपल्याला अपिल का होतात तर
त्यामागे असलेले विनोबांचे सखोल चिंतन, अविरत साधना व विचारपूर्वक केलेली नेमकी
शब्दयोजना होय. 

ही नुसती "पंच्" फुल वाक्ये नसून संपूर्ण पारमार्थिक व लौकिक जीवनावरचा व्यापक
विचारच अतिशय छोट्या छोट्या वाक्यात त्यांनी मांडलाय हे जाणवतं. सुरुवातीला मी
देखील या फटक्यांमधे, त्यातील पंचेसमधे गुंतून पडलो - पण जसजसे आपण वाचत जाऊ,
त्यावर चिंतन करु तसतशी त्याची गोडी वाढतच जाते, विनोबांविषयीचा आदरभाव दुणावतच
जातो.

हे विचार जसजसे आपण अभ्यासत जाऊ तसतसे ते आपल्याला
त्या सखोलतेत घेउन जातात; त्यातील गंभीरता, अनमोलत्व अजून अजून जाणवायला
लागते.
श्रद्धावान असूनही त्यांच्या विचारांमधे ते कमालीचे रॅशनलही आहेत हे
आपल्याला नक्कीच जाणवते. तसेच नुसती थेअरी सांगण्यात त्यांना रस नसून ते अतिशय
प्रॅक्टिकलही आहेत हेदेखील आपल्या लक्षात येते. 

या सर्व विचारमांडणीत जे एक अनुपम सौंदर्य आहे तेदेखील
एका नि:संगाच्या ठायी असलेल्या रसिकतेची चुणूक दाखवणारे असेच आहे.

त्यांचा परमार्थ हा कुठेही माया-ब्रह्म या घोटाळ्यात
अडकत नाही तर तो आपल्या अगदी जवळचा तसेच आचरण्यालाही सोपा वाटू लागतो - हेदेखील या
पुस्तकाचे एक आगळेवेगळेपण. 

हे विचार आपल्या मनाचा, बुद्धिचा व अंतःकरणाचा ठाव
घेतात, आपल्या जाणीवा जास्तच सजग होउ लागतात व सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या
सगळ्या चित्तवृत्तींसह संपूर्ण ईश्वरशरणता साधण्यात आपल्याला मदतच
करतात.

त्यामुळे ही वन लायनर न रहाता एखाद्या क्रांतदर्शी पण आधुनिक ऋषीची
मंत्रवाणीच आहे असे वाटू लागते; निदान माझी तरी तशी श्रद्धाच आहे.

--------------------------------- 

विचार पोथी - परंधाम प्रकाशन, पवनार.

१] सत्याची व्याख्या नाही. कारण, व्याख्येचाच आधार सत्यावर आहे.

२] स्वधर्म सहजप्राप्त असतो. मुलाला दूध पाजण्याचा धर्म आई मनुस्मृतीतून शिकत
नाही.

३] आत्मे सगळेच आहेत. पण आत्मवान् एखादाच.

४] संध्याकाळची प्रार्थना म्हणजे अंतकाळचे स्मरण आहे.

५] गीता अनासक्ति सांगते. पण ईश्वरात आसक्त हो म्हणतेच.

६] अत्त्युत्तम कल्पनांचे विपर्यास अत्यंत हीन असतात. ताज्या फळासारखे अन्न
नाही, तर कुजलेल्या फळासारखे आरोग्यनाशकहि नाही.

७] गंडकीच्या पाण्यात राहून शाळिग्राम वाटोळा, गुळगुळीत होतो, पण भिजत नाही. तसे
सत्संगतीत राहून आम्ही सदाचरणी होऊ, पण एवढे बस नाही. भक्तीने भिजले पाहिजे.

८] सेवा भागिले अहंकार = भक्ति

९] वर्तनाला बंधन असावे म्हणजे वृत्ति मोकळी रहाते.

१०] गीतेत हिमालय स्थिरतेची विभूति सांगितली आहे. ज्याची बुद्धि स्थिर आहे तो
हिमालयातच आहे.

११] शरीरनाश हा नाशच नव्हे. आत्मनाश होतच नाही. नाश म्हणजे बुद्धिनाश.

१२] नामरुप मिथ्या असले तरी भगवंताचे नामरुप मिथ्या म्हणू नये.

१३] नदीमधे मी देवाची वाहती करुणा पाहतो. 

१४] आत्मविषयक अज्ञान हे प्राथमिक अज्ञान. आपल्या ठिकाणी हे अज्ञान आहे ह्याची
जाणीव नसणे म्हणजे ते 'अज्ञानाचे अज्ञान' किंवा गणिताच्या भाषेत 'अज्ञानवर्ग'. आपण
ह्या अज्ञानवर्गात सामील आहोत, ह्या गोष्टीचा इनकार करणे म्हणजे 'अज्ञानघन'.
ह्यालाच 'विद्वत्ता' म्हणतात.

१५] वेद जंगल आहे. उपनिषदे गाई आहेत. गीता दूध आहे. संत दूध पीत आहेत. मी
उच्छिष्टाची आशा राखून आहे.

१६] मनुष्य आणि पशु ह्यांच्यातील मुख्य विशेष वाणीचा आहे. जर पशूच्या ठिकाणी
मनुष्यासारखी वाणी कल्पिता आली तर त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी मनुष्यासारखा
विचारही कल्पिता येईल. म्हणून वाणी पवित्र राखणे हे मनुष्याचे स्वाभाविक कर्तव्य
आहे.

१७] दैव अनुकूल करण्याची साधने कोणती?
---(१) प्रयत्न, (२) प्रार्थना

१८] नम्रतेच्या उंचीला माप नाही.

१९] "समोरचा दिवा आहे हे जसे निश्चित, तसे देव आहे हे तुम्ही निश्चित मानता
का?"
---- देव आहे मी निश्चित मानतो. समोरचा दिवा आहेच याची मी हमी घेऊ शकत
नाही. 

२०] सद्भावाने साधनेचे नाटक केले तरी चालेल.

२१] अहंकाराला वाटते. 'मी' नसलो तर जगाचे कसे चालेल ? वस्तुस्थिती अशी आहे की,
मीच काय पण संबंध जग नसले तरी जगाचे चालण्यासारखे आहे.

२२] परमार्थ कठिण म्हटला तर आम्ही भीतीने घरच सोडीत नाही; सोपा म्हटला तर
बाजारात विकत घ्यायला धावतो.

२३] सर्वच प्रश्न सोडवून सुटणारे नसतात. काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.

२४] अल्प श्रद्धेच्या माणसाला लोक परमार्थ पचनी पडू देत नाहीत, हा लोकांचा उपकार
आहे.

२५] उपासना म्हणजे देवाच्या जवळ बसणे, म्हणजेच बसल्या जागी देवाला आणणे.

२६] मनुष्य आधी दरिद्री होतो. द्रव्य मागून जाते. 

२७] संसाराच्या खोलीला भिऊ नको. तुला पोहून पृष्ठभागावरुन जायचे आहे ना ? की आत
बुडायचे आहे ?

२८] 'हवेची खोली' म्हणून एखादी स्वतंत्र खोली नाही. सर्वच खोल्यातून हवा पाहिजे.
तसे, धर्म म्हणून स्वतंत्र विषय नाही. सर्व व्यवहारात धर्म पाहिजे.

२९] साधन अल्प असो, पण उत्कटता तारील.

३०] जप म्हणजे आंत न मावणार्‍या निदिध्यासाचे प्रगट वाचिक रुप, अशी माझी जपाची
व्याख्या आहे.

३१] 'सायन्स' ची कितीही सूक्ष्म दुर्बीण घेतली तरी आत्म्याचा आवाज ऐकण्याच्या
कामी ती निरुपयोगी आहे.

३२] गुण किंवा दोष 'सहकुटुंब सहपरिवार येऊन कार्यसिद्धि' करीत असतात. 

 ३३] तप आणि ताप ह्यातील विभाजक रेखा ओळखणे जरुर आहे.

३४] अंध श्रद्धा म्हणजे काय ? - 'तर्क तो देव जणावा' ह्या श्रद्धेचे नांव अंध
श्रद्धा.

३५] समुद्राचा देखावा आनंदमय आहे. पण तो तीरावरुन पाहणाराला, आंत बुडणाराला
नव्हे.

३६] मेघागमनाने हृदय उचंबळून येते ह्याचे कारण 'नभासारखे रुप या राघवाचे' हेच
नव्हे काय ?

३७] समोरच्या झाडाच्या पानात जो वेदमंत्र वाचू शकतो त्याला वेद समजला.

३८] ध्यानाला आसन, विचाराला चलन.

३९] पुराणकारांनी काल्पनिक देव उभे करुन त्यांची स्तुती केली. काल्पनिक राक्षस
निर्माण करुन त्यांची निंदा केली. अशा रीतीने मनुष्याचे नाव वगळून 'न म्हणे कोणासी
उत्तम वाईट' हे सूत्र सांभाळले आणि परभारे नीतिबोधाचे कार्य साधले. हे देव आणि
राक्षस आमच्याच हृदयात रहात आहेत, एवढे आम्ही ओळखले पाहिजे. 

४०] पौर्णिमेला कृष्णाचा मुखचंद्र पहावा, अमावस्येला कृष्णाची अंगकांति
पहावी.

४१] 'जगाच्या पूर्वी काय होते?'
--- या तुझ्या प्रश्नाचा अभाव होता.

४२] 'आत्म्याचे अस्तित्व' हे शब्द पुनरुक्त आहेत. कारण, आत्मा म्हणजेच
अस्तित्व.

४३] 'संन्यास घेणे' ह्याला काहीच अर्थ नाही. कारण संन्यास म्हणजेच 'न घेणे'.

४४] धुमसत असताना प्रगट करु नये. पेटल्यावर दिसेलच.

४५] देवा, मला भुक्ति नको, मुक्ति नको - भक्ति दे.
..... सिद्धि नको, समाधि
नको - सेवा दे.

४६] प्राप्तीपेक्षा प्रयत्नाचा आनंद विशेष आहे.

४७] आग्रह महत्वाची शक्ति आहे. किरकोळ कामात वापरुन टाकणे बरे नाही. 

४८] सकाळचा तेवढा रामप्रहर, आणि बाकीचे काय हरामप्रहर आहेत ? भक्ताला सर्व काळ
सारखाच पवित्र असला पाहिजे.

४९] वारा आपणहून माझ्या खोलीत येतो. सूर्य आपणहून माझ्या खोलीत शिरतो. देवही
असाच आपणहून भेटणार आहे. माझी खोली मोकळी असू दे म्हणजे झालं.

५०] वेदांतासारखा अनुभव नाही.
गणितासारखे शास्त्र नाही.
रसोईसारखी कला
नाही.

५१] जीवन हे विचार, अनुभव आणि श्रद्धा ह्यांचे घनफळ आहे.

५२] साधक अग्नीसारखा असावा - विवेक ह्याचा प्रकाश, वैराग्य उष्णता.

५३] मनात साचलेली अडगळ साफ करुन मन मोकळे करणे हे अपरिग्रहाचे कार्य आहे.

५४] प्रत्यक्षाने अंध झालेल्या बुद्धीला सनातन सत्ये कशी दिसणार ?

५५] प्राप्त झालेल्या कशाहि परिस्थितीचे भाग्य बनवण्याची कला भक्ताजवळ
असते.
'अवघी भाग्ये येती घरा | देव सोयरा झालिया ||'

५६] लाड करणारी आई असते म्हणून मुलाचे बोबडे बोलणे शोभते. क्षमाशील परमेश्वर आहे
म्हणून मनुष्याचे अज्ञान शोभते.

५७] अति दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत.

५८] कोणता तारा उंच आणि कोणता खाली ह्याला जो अर्थ आहे (म्हणजे मुळीच नाही) तोच
कोणता माणूस उंच आणि कोणता नीच ह्याला अर्थ आहे. दोन्ही एकाच आकाशात भिन्न भिन्न
जागी आहेत एवढेच म्हणावयाचे.

५९] नृसिंहाची पूजा, प्रह्लादाचे अनुकरण.

६०] वेदार्थ स्वच्छ समजत असेल, घटकाभर समाधि लागत असेल, नामस्मरणाने सात्विक भाव
उमटत असतील म्हणून काय झाले ? आचरणात उतरेल तेच खरे.

६१] "आत्मा कशाने सिद्ध होतो?"
ह्या तुझ्या प्रश्नाने सिद्ध होतो.
माझे हे
उत्तर तुला पटले, तर त्या पटण्याने सिद्ध होतो. न पटले, तर त्या न पटण्याने सिद्ध
होतो.

६२] टेकडीसारखे उंच होण्याची मला मौज वाटत नाही. माझी माती आसपासच्या जमिनीवर
पसरली जावी ह्यात मला आनंद आहे.

इति ॥