मी रोज व्यक्तिमत्व सुधारून पाहतो!

गझल
वृत्त: कन्दर्प वृत्ताच्या जवळचे?
लगावली: गागाल/गालगाल/लगागाल/गालगा
************************************************

मी रोज व्यक्तिमत्व सुधारून पाहतो!
आयुष्य आजकाल तपासून पाहतो!!

होईल पूर्ण वा अपुरे राहिले तरी;
दररोज एक स्वप्न चितारून पाहतो!

चैतन्य आणण्यास जरा मैफिलीमधे....
हुकुमीच शेर आज फवारून पाहतो!

कर हट्ट तू मना पण हटवाद हा नको!
तू थांब, ईश्वरास विचारून पाहतो!!

   वार्धक्य पाहते गळते पान पान जे....
मी मात्र आतुनीच फुलारून पाहतो!

मी आजवर भिडस्तपणे वागलो किती!
आता जराजराच नकारून पाहतो!!

दचकून, घाबरून जिणे खूप जाहले!
भीती, तणाव, ताण झुगारून पाहतो!!

ही धूळही नभात उडे स्वैर कैकदा....
मीही अता नभात भरारून पाहतो!

असतात नेहमी ढग नादात आपल्या!
वारा विषण्ण त्यांस पुकारून पाहतो!!

तो चेहरा तुझा दिसतो श्रावणापरी....
पाऊस मुसळदार कधी ऊन पाहतो!

या आरशासमोर किती थांबतेस तू!
बघ, तो तुला लपून, निहाळून पाहतो!!

या चेहऱ्यात काय असे माझिया दिसे?
जो तो उगाच हात उगारून पाहतो!

डावे कधी, कधी उजवे....चालतेच हे!
संसार मोडकाच उभारून पाहतो!!

मी तोंड द्यायला शिकलो जीवनासही;
एकेक संकटास निवारून पाहतो!

साहेब आमचा बघतो नेहमी असा....
डोळे मधे मधेच वटारून पाहतो!

स्वप्नात रोज रोज पहाटेस ये सखे....
मीही तुला बघून, दवारून पाहतो!

जातेस तू जशी सर जावी पडून ती....
हा माळही उजाड तरारून पाहतो!

लावण्य लाजवेल फुलाला असे तुझे!
जो तो तुला दुरून शहारून पाहतो!!

झालीच वाहवा तर कोणास नावडे?
प्रत्येकजण मधेच फुशारून पाहतो!

नजरेत गोड गोड तुझ्या शर्करा जशी!
मधुमेहही असून मधाळून पाहतो!!

 .........प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१