विरळा वारकरी

विरळा वारकरी 

जीवभाव सारी ।
हीच मानी वारी ।
असा वारकरी ।
विरळाच ॥
तुका ज्ञानियाचा ।
शब्द अमृताचा ।
तोची एक साचा ।
मानुनिया ॥
अभ्यासितो नित्य ।
कळावया सत्य ।
येर सारे मिथ्य ।
सांडूनिया ॥ 
राहतो जागृत ।
अंतरी दिनरात ।
बळ ते राखीत ।
भक्तिचेच ॥
ध्यातसे निर्गुण ।
पूजितो सगुण ।
मानूनी वचन ।
संतांचेच ॥
न जाता तीर्थासी ।
न सोडी गृहासी ।
तद्रूप विठूसी ।
होत भला ॥