सह्याद्रीस केंद्रस्थानी धरून पूर्वीचा हा प्रदेश आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली होत असणारा पर्यावरणाचा ऱ्हास ह्यावर भाष्य करणारी दोन भागांची कविता...
पूर्वी
पल्याड माडांच्या रांगा
अल्याड वाहती गंगा
मध्ये उभा मर्द रांगडा
हाची सह्याद्रीचा कडा
गर्द झाडीचा प्रदेश सारा
मिळे निवारा विविध वनचरा
रविकिरणाचे दर्शन दुर्मिळ
वनात लपली अवनी निर्मळ
हिरवी मलमल लेऊनी सजला
टणक पुराणा खडक सावळा
असंख्य निर्झर घेऊनी आल्या
स्वर्गातूनी जणू दुग्ध-शृंखला
गडकोटांची अभेद्य माला
कोंदण लाभे जसे हिऱ्याला
साक्षीदार हे इतिहासाचे
गौरवशाली महाराष्ट्राचे
तुझीया कुशीत ज्या गनीमाने
येणे केले मूढपणाने
जळूनी गेले शिवतेजाने
अन वीरांच्या पराक्रमाने
आणि आता
वने कधीची लुप्त जाहली
हिंस्र श्वापदे नगरी आली
गंगा? छे! छे! गंगा कसली
सारी घाण ह्यात मिसळली
खडक फोडला शहरे वसली
कसले निर्झर? मलमल कसली?
रविकिरणाचे ताप सोसता
वनीकरणाची गरज उमजली
महत्त्व गेले गडकोटाचे
स्थान झाले पर्यटनाचे
साक्षीदार हे इतिहासाचे
साक्ष देती प्रेम-प्रकरणाचे
गनीम कशाला तुझी लेकरे
रोज तोडती तुझी लक्तरे
कंप होई मग आठवीतसे
पुन्हा तयांना जुना 'वक्त' रे!
(जुना वक्त म्हणजे जुना-काळ किंवा जुना हिंदी चित्रपट वक्त ज्यामध्ये भूकंप होतो)